‘आयटीआर-४’विवरणपत्राचे वैशिष्ट्य

डॉ. दिलीप सातभाई 
Monday, 29 June 2020

आयटीआर-४ हा विवरणपत्राचा फॉर्म प्राप्तिकर कायद्याच्या कलम ४४एडी, कलम ४४एडीए आणि कलम ४४एई नुसार गृहीत उत्पन्न योजनेचा पर्याय निवडलेल्या करदात्यांसाठी आहे. कोणाला हे विवरणपत्र भरता येणार नाही?

करदात्यांचे शेतीपासून मिळणारे करमुक्त उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असेल (इतर करमुक्त उत्पन्नास अट नाही), लॉटरी वा घोड्यांच्या शर्यतीत उत्पन्न मिळवले असेल, भांडवली लाभ, व्यवसायातून उत्पन्न मिळवले असेल, परदेशात काही मालमत्ता असल्यास, परदेशी करसवलत मिळणार असेल, काही उत्पन्न परदेशातून आले असेल, उर्वरीत स्त्रोतातून मिळणारे उणे उत्पन्न असेल किंवा जी व्यक्ती कंपनीमध्ये संचालक असेल, शेअर बाजारात नोंद नसणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असल्यास, घरापासून मिळणाऱ्या उत्पन्नाऐवजी नुकसान होत असेल व ते पुढील वर्षासाठी ओढायचे असेल तर किंवा करदाता निवासी व सामान्य निवासी नसेल किंवा अनिवासी असेल तर हे विवरणपत्र भरता येणार नाही. ज्या करदात्यांनी वर निर्दिष्ट केलेल्या अटीपैकी एक जरी अट पूर्ण केल्यास त्यांनी आयटीआर-३ भरावयाचा आहे. 

काय आहेत महत्त्वाचे बदल?
पगारदार, निवृत्तीवेतनधारक व ज्येष्ठ नागरिक वर्गात प्राप्तिकर विभागामार्फत उत्पन्नाची शक्‍यतो छाननी न होणारे विवरणपत्र म्हणून आयटीआर-४ (सुगम) या विवरणपत्रात बदल झाले आहेत. एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या वर्षभरात करदात्याने एक किंवा अधिक वीजजोडांवर आलेल्या सर्व वीज देयकांवर मिळून एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली असल्यास ती रक्कम, तर वर्षभरात एक किंवा अनेक चालू, बचत, मुदत, आवर्ती खात्यांमध्ये एकत्रितरीत्या एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम भरली असल्यास ती रक्कम, तसेच वर्षभरात परदेशीवारीवर दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असल्यास त्याची रक्कम उपलब्ध रकान्यांमध्ये भरणे बंधनकारक आहे. कोविड-१९ च्या संकटामुळे करदात्यांना सवलतींचा लाभ मिळवून देण्यासाठी एक एप्रिल २०२० ते ३१ जुलै २०२० या चालू २०२०-२१ वर्षाच्या कालावधीत केलेल्या करबचत गुंतवणुकीच्या आधारे २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नातून वजावट मागण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याची माहिती एका तक्‍त्याद्वारे द्यावी लागणार आहे. याखेरीस करदात्याकडे पासपोर्ट असल्यास त्याचा क्रमांक लिहिणे आवश्‍यक आहे; न लिहिल्यास कारवाई होऊ शकते. एक नवा चेकबॉक्‍स सुरू करण्यात आला असून, १३९ कलमांतर्गत भरलेले विवरणपत्र सामान्य फायलिंग दरम्यान नमूद केले गेले आहे, की नोटिशीस प्रतिसाद म्हणून दाखल केले आहे, हे स्पष्ट करावे लागणार आहे. वस्तू व सेवाकर कायद्याअंतर्गत धंद्याची किती उलाढाल दर्शविली आहे, त्याची माहिती द्यावी लागणार आहे. मालवाहू वाहनांची माहिती म्हणजेच नोंदणी क्रमांक, मालकी हक्क, वाहनाची मालवाहू क्षमता आदी माहिती भरायची आहे. यंदाच्या वर्षापासून निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीधारक असा नवा पर्याय समाविष्ट करण्यात आला आहे. 

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना... 

कलम ४४ एडीए
आयटीआर-४ (सुगम) मध्ये डॉक्‍टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक, आर्किटेक्‍ट, इंटेरिअर डेकोरेटर, तांत्रिक सल्लागार, अंतर्गत सजावटकार, अधिकृत प्रतिनिधी, चित्रपट कलाकार, कंपनी सचिव आणि माहिती तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. अधिकृत प्रतिनिधीचा अर्थ कोणतीही व्यक्ती, जो एखाद्याचे प्रतिनिधित्व करतो, फी किंवा मोबदल्यासाठी, कोणत्याही कायद्यांतर्गत कोणत्याही न्यायाधिकरण किंवा प्राधिकरणासमोर. चित्रपट कलाकारांमध्ये निर्माता, कॅमेरामन, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, कथालेखक, पटकथा लेखक आदी. मुळात कोणतीही व्यक्ती जो त्याच्या व्यावसायिक क्षमतेत सामील आहे. एकूण निर्देशित वीस व्यावसायिकांना मिळणारे ढोबळ सेवाशुल्क इतर स्त्रोतापासून मिळणाऱ्या उत्पन्नासह ५० लाख रुपयांपेक्षा अधिक नसल्यास, कलम ४४एडीए अंतर्गत मिळालेल्या सेवाशुल्काच्या ५० टक्के रक्कम उत्पन्न गृहीत धरण्याची सुसंधी या ‘आयटीआर-४’मध्ये उपलब्ध करून देण्यात आली असल्याने मोठ्या प्रमाणावर प्राप्तिकर वाचणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

(लेखाचा उर्वरित भाग पुढील सोमवारच्या अंकात)  (लेखक चार्टर्ड अकाउंटंट - सीए आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Dilip satbhai writes about Feature of ITR-4 Statement