esakal | म्युच्युअल फंड्स : नव्या आर्थिक वर्षातील पंचसूत्री
sakal

बोलून बातमी शोधा

mutual funds.

नव्या म्हणजे २०२१-२२ या आर्थिक वर्षात देखील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळेल, अशी अपेक्षा ठेवूया.

म्युच्युअल फंड्स : नव्या आर्थिक वर्षातील पंचसूत्री

sakal_logo
By
डॉ. वीरेंद्र ताटके

भारतीय म्युच्युअल फंडांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षात उत्तम कामगिरी केली. नव्या म्हणजे २०२१-२२ या आर्थिक वर्षात देखील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळेल, अशी अपेक्षा ठेवूया. त्या दृष्टीने पुढील पाच मुद्दे लक्षात ठेवावेत.

१) चांगली कामगिरी करणारे म्युच्युअल फंड विकू नका!

आपल्या पोर्टफोलिओतील खराब कामगिरी करणारे म्युच्युअल फंड तसेच ठेवून चांगली कामगिरी करणारे म्युच्युअल फंड विकण्याचा मोह गुंतवणूकदारांना होऊ शकतो. उदाहरणार्थ, गेल्या दहा वर्षांत सरासरी १८ टक्के वार्षिक परतावा देणारा एक फंड आणि फक्त ३ टक्के वार्षिक परतावा देणारा दुसरा म्युच्युअल फंड असे दोन फंड आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील, तर त्यापैकी चांगली कामगिरी करणारा फंड विकून त्यावरील फायदा पदरात पाडून घ्यावा, असा विचार मनात येऊ शकतो. खरे तर गेल्या दहा वर्षांत चांगली कामगिरी करू न शकणारा म्युच्युअल फंड विकून टाकला पाहिजे आणि सातत्याने चांगली कामगिरी करणारा म्युच्युअल फंड न विकता त्यात अधिक गुंतवणूक करत राहिली पाहिजे.

२) एकरकमी मोठी गुंतवणूक टाळा :

शेअर बाजारातील ‘निफ्टी’ आणि ‘सेन्सेक्स’ या दोन्ही निर्देशांकाचे ‘पीई’ गुणोत्तर सर्वोच्च पातळीवर पोचले आहे. बहुतेक सर्व इक्विटी म्युच्युअल फंडांचे बाजारभाव (एनएव्ही) देखील सर्वोच्च पातळीच्या आसपास पोचले आहेत. अशा वेळी कोणत्याही इक्विटी म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी ती रक्कम विभागून टप्प्याटप्प्याने गुंतवली पाहिजे. उदाहरणार्थ, एका उत्तम फंडात एकरकमी पाच लाख रुपये गुंतविण्याऐवजी त्यातील एक लाख रुपये एकरकमी गुंतवून, त्याच फंडात दरमहा २५ हजार रुपयांची एक वर्ष कालावधीची ‘एसआयपी’ सुरु करावी. असे एकूण चार लाख रुपये गुंतवणूक करून काही कारणाने बाजार जर वेगाने कोसळला, तर खालच्या पातळीवर खरेदीसाठी एक लाख रुपये बाजूला ठेवावेत.

हेही वाचा - टेन्शन नॉट! UPI, IMPS बँक ट्रान्सफर फेल झालं? असं मिळवा रिफंड

३) इंडेक्स फंडांवर लक्ष ठेवा!

शेअर बाजाराच्या निर्देशांकातील कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ‘इंडेक्स फंडां’वर लक्ष ठेवावे. दोलायमान स्थितीत असलेला निर्देशांक दोन-तीन टक्के वर-खाली होताना दिसत आहे. अशा वेळी ‘इंडेक्स फंडा’त खालच्या पातळीवर एकरकमी गुंतवणुकीची संधी निर्माण होते. अर्थात या जोडीला अशा फंडात नियमित ‘एसआयपी’ सुरु ठेवावी.

४) गोल्ड फंडातील संधी :

गेल्या काही महिन्यांमध्ये ‘गोल्ड फंडां’च्या बाजारभावात घसरण झालेली दिसत आहे. गेल्या वर्षात तेजीत असलेल्या सोन्याच्या बाजारभावाची सर्वोच्च पातळीपासून घसरण झाल्यामुळे अशा फंडात खरेदीची संधी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. शेअर बाजार जेव्हा कोसळतो, तेव्हा सोन्याचा भाव वाढतो, अशी आतापर्यंतची आकडेवारी दर्शविते. त्यामुळे आपल्या एकूण गुंतवणुकीचा काही भाग ‘गोल्ड फंडा’त नियमितपणे गुंतवायला हवा.

हेही वाचा - Home Loan: आता होम लोनही महागणार, SBI ने वाढवले व्याजदर

५) प्राप्तिकराचे नियम लक्षात घ्या!

ज्यांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची विक्री या आर्थिक वर्षात करायची असेल, त्यांनी या संदर्भातील प्राप्तिकराचे नियम तज्ज्ञ व्यक्तींकडून समजून घ्यावेत. विशेषतः म्युच्युअल फंडावरील अल्पकालीन भांडवली कर आणि दीर्घकालीन भांडवली कर यांचे नियम नीट समजून घेवून त्याप्रमाणे नियोजन करावे.

वरील पाच सूत्रे पाळून या आर्थिक वर्षातही म्युच्युअल फंडात नियमितपणे गुंतवणूक करीत राहिले पाहिजे.

(लेखक म्युच्यअल फंडाचे अभ्यासक आहेत.)

loading image