अर्थभान : ‘भूल नही जाना रे...!’

डिसेंबर सुरु झाला, की सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत, या पार्श्वभूमीवर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असते.
Income Tax Return
Income Tax ReturnSakal

डिसेंबर सुरु झाला, की सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत, या पार्श्वभूमीवर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असते. मात्र, या धामधुमीत या महिन्यात आर्थिक आघाडीवर झालेल्या काही महत्त्वाच्या बदलांकडे दुर्लक्ष होता कामा नये. यातील काही महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत-

प्राप्तिकराचे विवरणपत्र

आर्थिक वर्ष २०२०-२१ चे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे. ज्या करदात्यांनी या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र अजूनही दाखल केले नसेल, त्यांच्यासाठी ही तारीख महत्त्वाची आहे. आपल्याला नक्की कोणते विवरणपत्र भरावे लागेल, त्यासाठी कोणकोणते तपशील लागू शकतील, यांची माहिती करदात्यांनी त्वरित घेतली पाहिजे. त्यासाठी अंतिम तारखेची वाट पाहात बसू नये.

टर्म इन्शुरन्स महागण्याची चिन्हे

आयुर्विमा कवच घेण्यासाठी ‘टर्म इन्शुरन्स’ हा सर्वांत सोपा आणि स्वस्त पर्याय समजला जातो. या प्रकारच्या विम्याचा हप्तादेखील तुलनेने खूप कमी असतो. मात्र, येणाऱ्या काळात टर्म इन्शुरन्सच्या हप्त्याची रक्कम वाढेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढलेला धोका लक्षात घेऊन विमा कंपन्या हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना टर्म इन्शुरन्स घ्यायचा असेल, त्यांनी आता वेळ न दवडता पावले उचलली पाहिजेत.

सिल्व्हर एक्स्चेंज ट्रेडेड फंड

सोन्याप्रमाणेच चांदीत गुंतवणूक करण्यासाठी सिल्व्हर एक्स्चेंज ट्रेडेड फंड (सिल्व्हर ईटीएफ) या महिन्यात बाजारात दाखल होणार आहेत. ‘गोल्ड ईटीएफ’च्या माध्यमातून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आधीपासून गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे. आता ‘सिल्व्हर ईटीएफ’च्या स्वरूपात गुंतवणूकदारांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. चांदीच्या भावात होणाऱ्या चढ-उतारांचा फायदा घेता येणार आहे. या फंडाचा खर्च, त्याची कार्यपद्धती आणि गुंतवणुकीची सुरक्षितता या दृष्टीने ‘सेबी’ने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

म्युच्युअल फंडांची पारदर्शकता

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी दोन स्वागतार्ह बदल या महिन्यात होणार आहेत. पहिला बदल हा डेट फंडांमध्ये होणार आहे. अशा डेट फंडांचे व्यवस्थापक संबंधित फंडाची गुंतवणूक करताना जास्तीतजास्त किती जोखीम घेऊ शकतात, याची माहिती गुंतवणूकदारांना देणे या महिन्यापासून बंधनकारक होणार आहे. या बदलामुळे आपण गुंतवणूक करत असलेल्या फंडाची भविष्यातील संभाव्य जोखीम किती असू शकते, याची पूर्वकल्पना गुंतवणूकदारांना मिळणार आहे. या संदर्भातील दुसरा बदल म्हणजे म्युच्युअल फंड कंपनीमध्ये नोकरी करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीसंदर्भातील कोणत्याही संवेदनशील माहितीचा उपयोग करून शेअर बाजार गुंतवणुकीतून स्वतःचा फायदा करून घेता येणार नाही. त्या संदर्भात ‘सेबी’ने जाहीर केलेली नियमावली याच महिन्यात लागू होत आहे.

थोडक्यात, आर्थिक क्षेत्रातील या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करू नये, असा ‘भूल नही जाना रे’ हा सल्ला प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे.

(लेखक गुंतवणूक विषयाचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com