2021 देणार गूड न्यूज! वर्षअखेरपर्यंत अर्थव्यवस्था 'प्री-कोविड'सारखी होईल

टीम ई सकाळ
Thursday, 31 December 2020

एप्रिल ते जूनच्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी शून्यावरून - 24 इतका खाली गेला. अशावेळी कोणीही सांगू शकत नव्हतं की जीडीपी पुन्हा चांगल्या परिस्थितीत कधी येऊ शकेल.

नवी दिल्ली - कोरोनाने जगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जिवितहानीसह मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही प्रचंड झाली. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका यामुळे बसला. भारतातही विकासाचा वेग यामुळे कमी झाला. एप्रिल ते जूनच्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी शून्यावरून - 24 इतका खाली गेला. अशावेळी कोणीही सांगू शकत नव्हतं की जीडीपी पुन्हा चांगल्या परिस्थितीत कधी येऊ शकेल. कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम जसजसे शिथिल करण्यात आले तसतसे अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. 

नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार यांनी देशाची अर्थव्यवस्था 2021-22 मध्ये 10 टक्के वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, पुढच्या वर्षअखेरपर्यंत देशाची अर्थव्यवस्था कोरोना काळाच्या आधीसारखी (प्री-कोविड) होईल. तसंच 2020-21 च्या चौथ्या तिमाहीत वाढ सकारात्मक दिसेल असंही राजीव कुमार यांनी सांगितलंय.

स्वामीनाथन एस अंकलेसरिया अय्यर यांनी इकॉनॉमिक टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखातही 2021 मध्ये अर्थव्यवस्था तेजीत दिसेल असं म्हटलं आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेत उद्योगधंदे, व्यवसाय पुन्हा सुरु झाल्यानं त्याचा चांगला परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागला. दरम्यान, सरकारकडून व्याजावर व्याज माफ केलं. आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, इपीएफओतून पीएफ रक्कम काढण्याची सुविधा दिली. याचाही सकारात्मक परिणाम झाल्याचं ते म्हणाले. 

हे वाचा - FASTags टोलसंदर्भात मोठा निर्णय; 100 टक्के ऑनलाइन कलेक्शनला दिली मुदत वाढ

स्वामीनाथन यांच्या मते जगभरात लसीकरण सुरु झालं की त्यानंतर जगासह भारतातील आर्थिक व्यवहार वेगाने वाढतील. क्रूड ऑइलचे वाढते दर हे त्याचंच एक उदाहरण आहे. जीडीपीमध्ये ज्या वस्तूंचा समावेश आहे त्यातील सध्या पर्यटन, मनोरंजन, खाणं-पिणं, प्रवास या क्षेत्रात अद्याप म्हणावी तितकी प्रगती नाही. मात्र लसीकरणानंतर यातही सर्व सुरळीत होऊ शकतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: end of next year our economy will reach pre-COVID level says niti ayog