'EPFO' सदस्यांना 50 हजारांचा 'लॉयल्टी बोनस'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

'ईडीएलआय'कडे 18 हजार 119 कोटींची शिल्लक
'सीबीटी'ने सदस्यांसाठी केलेल्या शिफारशींची पूर्तता करण्यासाठी असणाऱ्या 'ईडीएलआय'कडे 18 हजार 119 कोटींच्या निधीची रक्कम शिल्लक आहे. ही रक्कम केवळ कर्मचारी कल्याण योजनांकरिताच वापरता येऊ शकते. त्यामुळे शिफारस केलेल्या योजनांचा लाभ 'ईडीएलआय'च्या निधीमधून केला जाऊ शकतो, असे EPFOच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

(अर्थविषयक बातम्यांसाठी क्लिक करा : sakalmoney.com

नवी दिल्ली: केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) वीस वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत सदस्य असणाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा 'लॉयल्टी बोनस' देणार आहे. 'EPFO' च्या विश्‍वस्त मंडळाने याबाबत आज निर्णय घेतला. याचसोबत वीस वर्षांपर्यंत सेवा पूर्ण न करता कायमचे अपंगत्व अथवा मृत्यू आलेल्या सदस्यांनाही 'EPFO'च्या इतर योजनांचा लाभ घेता येणार आहे.

'EPFO'बाबत निर्णय घेणारे मंडळ असणाऱ्या केंद्रीय विश्‍वस्त मंडळाने (सीबीटी) याबाबतच्या शिफारशी केल्या आहेत. 'EPFO'च्या सदस्याचे अकाली निधन झाल्यास किमान अडीच लाखांपर्यंतच्या विमा रकमेचा लाभ मिळावा, अशी शिफारसही 'सीबीटी' मंडळाने केली आहे. याबाबत मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये सदस्यांच्या भविष्यातील फायद्याविषयीचे निर्णय घेण्यात आले. सीबीटीने शिफारस केलेले प्रस्ताव हे केवळ केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर उपलब्ध होणार असल्याचे 'EPFO'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लॉयल्टी कम आजीवन फायदा हा 58 ते 60 वर्षांदरम्यान निवृत्ती स्वीकारणाऱ्या सर्व सदस्यांना मिळणार असल्याचे 'EPFO'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कर्मचारी ठेव आधारित विमा योजनेचा (ईडीएलआय) लाभ दिव्यांग अथवा नोकरीदरम्यान कायमचे अपंगत्व अथवा मृत्यू आल्यास सदस्यांना किमान अडीच लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार सदस्याने एक वर्षापर्यंत सेवा केली असेल तरीही हा लाभ घेता येणार आहे. 'ईडीएलआय' 'EPFO' सदस्यत्वाची वीस वर्षे पूर्ण झाली नसली तरीही अडीच लाखांपर्यंत लाभ घेता येणार आहे.

ज्या 'EPFO' सदस्यांचे सरासरी मूळ वेतन पाच हजार रुपये असेल त्यांना 30 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. याचसोबत ज्यांचे मूळ वेतन 5001 ते 10,000 दरम्यान असेल त्यांना 40 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे आणि ज्या सदस्यांचे मूळ वेतन दहा हजारांपेक्षा जास्त असेल त्यांना पन्नास हजारांचा आजीवन लाभ मिळणार असल्याचे 'EPFO'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Web Title: EPFO members to get loyalty-cum-life benefit of up to Rs 50,000

टॅग्स