
अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असताना, भारतासाठी व्यक्त केलेला अंदाज महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.
वॉशिंग्टन (अमेरिका) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. २०२१ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ १२.५ टक्क्यांनी होईल, असा अंदाज ‘आयएमएफ’ने वर्तविला आहे. कोरोनाच्या महासाथीमुळे जगभरातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. फक्त चीन या एकमेव मोठ्या अर्थव्यवस्थेची गेल्यावर्षी सकारात्मक वाढ झाली.
‘आयएमएफ’ने आपल्या वार्षिक अहवालात लक्षवेधक अंदाज वर्तविले आहेत. त्यानुसार, २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ६.९ टक्क्यांनी होईल, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे २०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्था विक्रमी ८ टक्क्यांनी आकुंचित पावली होती. पण यंदा म्हणजे २०२१ मध्ये हीच वाढ आता तब्बल १२.५ टक्क्यांनी होईल, असे म्हटले गेले आहे. अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असताना, भारतासाठी व्यक्त केलेला अंदाज महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.
- SBIची मोठी घोषणा; घरबसल्या घ्या ८ सेवांचा फायदा
गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये चीनने २.३ टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदविली होती. यावर्षी (२०२१) त्यांची वाढ ८.६ टक्के, तर २०२२ मध्ये ५.६ टक्के होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
‘‘आमच्या आधीच्या भाकितांच्या तुलनेत जागतिक अर्थव्यवस्था अधिक भक्कमपणे सुधारत असल्याचा आमचा आता अंदाज आहे. २०२१ मध्ये ६ टक्के, तर २०२२ मध्ये ४.४ टक्के वाढीचा अंदाज आहे.’’
- गीता गोपीनाथ, ‘आयएमएफ’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ
- अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)