finance news investor seven lakh loss sensex down share market stock market BSE NSE Nifty mumbai
finance news investor seven lakh loss sensex down share market stock market BSE NSE Nifty mumbai sakal

गुंतवणूकदारांना सात लाख कोटींचा दणका

सेन्सेक्स १४५६ अंशांनी कोसळला

मुंबई : अमेरिकेत ४० वर्षांची उच्चांकी चलनवाढ झाल्याची आकडेवारी समोर आल्याने जगात सर्वत्र गुंतवणुकदारांची भीतीने गाळण उडाली व जगातील सर्वच शेअरबाजारांनी लोळण घेतली. भारतीय शेअरबाजार अडीच टक्क्यांहून जास्त म्हणजे सेन्सेक्स १,४५६.७४ अंश तर निफ्टी ४२७.४० अंशांनी कोसळला. 

आजच्या पडझडीमुळे सगळ्या गुंतवणुकदारांच्या सर्व शेअरचे एकूण मूल्य सुमारे सात लाख कोटी रुपयांनी घसरले. आज गुंतवणुकदारांच्या सर्व शेअरचे एकूण मूल्य २४५ लाखकोटी रुपये झाले, शुक्रवारी हे मूल्य २५१ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. ३० मे नंतर गुंतवणुकदारांच्या सर्व शेअरचे एकूण मूल्य १३.६ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. 

अमेरिकी चलनवाढीमुळे आता तेथील फेडरल रिझर्व्हतर्फे मोठी दरवाढ केली जाईल या भीतीमुळे आज जपान, हाँगकाँग, कोरिया हे आशियाई शेअर बाजार तीन टक्के तर शांघाय व ऑस्ट्रेलिया एक टक्क्याने कोसळले. अमेरिकी शेअर बाजारही शुक्रवारीच साडेतीन टक्क्यांपर्यंत गडगडला होता. आज युरोपीय शेअरबाजारही दोन टक्क्यांच्या आसपास पडले. त्यालाच अनुसरून सेन्सेक्स ५२ हजार ८४६.७० अंशांवर तर निफ्टी १५ हजार ७७४.४० अंशांवर स्थिरावला.

आज निफ्टी व सेन्सेक्सच्या प्रमुख शेअरपैकी फक्त नेस्ले व बजाज ऑटो हे दोनच शेअर किरकोळ वाढले. बाकी सर्व मुख्य शेअर तोटा दाखवीत बंद झाले. रुपयाचे गडगडणे व परकीय गुंतवणुकदारांची शेअर बाजारातील सतत विक्री यामुळेही वातावरण बिघडले. एरवी डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडला की परदेशातून महसूल मिळवणाऱ्या आयटी कंपन्यांचा नफा वाढतो, त्यामुळे त्यांच्या शेअरचे भाव वाढतात. मात्र आज चलनवाढीच्या भीतीमुळे त्यांच्या भावाचे गणितही कोलमडले.

आज एनएसई वरील १,९४७ शेअरचे भाव कमी

आज एनएसई वरील १,९४७ शेअरचे भाव कमी झाले तर २४८ शेअरचे भाव वाढले, फक्त ३९ शेअरचे भाव काल होते तेवढेच राहिले. तर बीएसई वरील एकूण ३,६१३ शेअरपैकी फक्त १६.६१ टक्के म्हणजे ६०० शेअरचे भाव वाढले तर ८०.२९ टक्के म्हणजेच २,९०१ शेअरचे भाव कमी झाले. ११२ म्हणजेच ३.१० टक्के शेअरचे भाव तेच राहिले.

आज टक्केवारीच्या हिशेबात बजाज फीनसर्व्ह सर्वात जास्त म्हणजे ७.०२ टक्क्यांनी किंवा ८५९ रुपयांनी घसरून ११,३९० रुपयांवर स्थिरावला. बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, टेक महिंद्र, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एनटीपीसी या शेअरचे भाव चार ते साडेपाच टक्के कमी झाले. इन्फोसिस, स्टेटबँक, लार्सन अँड टुब्रो, विप्रो, महिंद्र आणि महिंद्र, कोटक बँक, टाटास्टील हे शेअर तीन ते साडेतीन टक्के कोलमडले. तर अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएलटेक, एचडीएफसी, आयटीसी, डॉ. रेड्डीज लॅब, सनफार्मा हे शेअर दोन ते तीन टक्के पडले.

रुपयाचा नीचांक

शेअर बाजारातील पडझडीबरोबर आज रुपयानेही जोरदार गटांगळी खाल्ली. डॉलरच्या तुलनेत ११ पैशांनी घसरून रुपया ७८.०४ या नव्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. प्रथमच रुपयाने ७८ ची पातळी ओलांडली आहे. रुपयातील ही सलग तिसरी घसरण आहे.

बिटकॉइनची घसरगुंडी

जगभरातील क्रिप्टोकरन्सीजनी विक्रम नोंदवल्यानंतर काही महिन्यांनंतर आज लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनने १८ महिन्यांची नीचांकी पातळी गाठली. बिटकॉइनचा भाव आज २५,००० डॉलरच्या खाली आला. जागतिक बाजारातील विक्रीच्या दबावामुळे तसेच क्रिप्टोकरन्सी व्यवहार प्लॅटफॉर्म सेल्सियस नेटवर्कने बिटकॉइन खरेदी,विक्री आदी सर्व व्यवहार स्थगित करत असल्याचे जाहीर केल्याने गुंतवणूकदारांनी जोखीम कमी करण्याचे धोरण स्वीकारत बिटकॉइनची जोरदार विक्री केली. अमेरिकेत महागाईने ४० वर्षातील उच्चांक गाठल्याची आकडेवारी जारी झाल्याने तसेच मंदीच्या भीतीने शुक्रवारी जागतिक शेअर बाजारांमध्येही मोठी घसरण झाली. या पार्श्वभूमीवर बिटकॉइननेही आपटी खाल्ली आहे. आज सकाळी लंडनमध्ये बिटकॉइनचा भाव १० टक्क्यांनी घट नोंदवत २३ हजार ७९४ डॉलरची पातळी गाठली. डिसेंबर २०२० मध्ये बिटकॉइनने हा भाव दर्शवला होता. तर नोव्हेंबरमध्ये बिटकॉइनमध्ये ६५ टक्के घसरण होऊन तो ६८ हजार ९९१ डॉलरवर गेला होता.

महागाईत घट, झळ मात्र कायम

नवी दिल्ली : देशात अन्नधान्य आणि इंधन स्वस्त झाल्यानंतर मे महिन्यातील घाऊक महागाई निर्देशांकही एप्रिलच्या तुलनेत खाली आला आहे. एप्रिलमध्ये ७.७९ टक्के असलेला हा निर्देशांक मे महिन्यात ७.०४ टक्के इतका नोंदला गेला. महागाईत घट झाली असली तरी सामान्यांच्या खिशाला बसणारी झळ फार कमी झालेली नाही.

भारतीय रिझर्व्ह बँकेने महागाईवाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शुल्कात कपात आणि रेपो रेटमध्ये वाढ करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे महागाई अल्पप्रमाणात कमी झाली आहे. मात्र, तरीही रिझर्व्ह बँकेने महागाई वाढ सहन करण्याची मर्यादा ६ टक्के इतकी सांगितली असताना गेले सलग पाच महिने महागाई वाढीची टक्केवारी त्यापेक्षा अधिक नोंदली गेली आहे. गेल्या वर्षी, म्हणजे मे २०२१ मध्ये महागाई वाढीचा दर ६.३ टक्के इतका होता. यामुळे यंदा ऑगस्टमध्ये होणाऱ्या द्वैमासिक बैठकीत रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरांत ०.५० टक्क्यांनी वाढ केली होती.

ाअन्नधान्य स्वस्त झाल्याचा परिणाम महागाई कमी होण्यावर झाला. एप्रिलमध्ये अन्नधान्य महाग होण्याचा दर ८.३१ टक्के असताना मे महिन्यात हा दर ७.९७ टक्क्यांवर खाली आला, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. ग्राहक किंमत निर्देशांकात अन्नधान्यांच्या दरांचा वाटा ३९.०६ टक्के इतका असतो. केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही काही प्रमाणात खाली आल्या आहेत.

महागाईत झालेली घट

वस्तू : एप्रिल : मे

डाळी : ५.९६ : ५.३३

खाद्यतेल : १७.२८ : १३.२६

फळे : ४.९९ : २.३३

भाजीपाला : १५.४१ : १८.२६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com