'फोर्ब्स'ची यादी जाहीर; मुकेश अंबानी श्रीमंतांमध्ये अव्वल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत "रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड'चे (आरआयएल) अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुन्हा एकदा सर्वोच्च स्थानी झळकले आहे.

नवी दिल्ली : सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत "रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड'चे (आरआयएल) अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुन्हा एकदा सर्वोच्च स्थानी झळकले आहे. "फोर्ब्स इंडिया' मासिकाने 2019 या वर्षातील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. 
या यादीत 100 सर्वाधिक श्रीमंतांचा समावेश केला जातो. यात सलग 12 व्या वर्षी अंबानी यांचा समावेश झाला आहे. 51.4 अब्ज डॉलर संपत्तीसह त्यांनी पुन्हा प्रथम स्थान पटकाविले आहे.

पायाभूत क्षेत्रातील नावाजलेले उद्योजक गौतम अदानी या वेळी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 15.7 अब्ज डॉलर आहे. नऊ वर्षांनंतर प्रथमच अदानी यांनी आठव्या स्थानावरून दुसऱ्यावर उडी घेतली आहे. "विमानतळापासून डेटा केंद्रापर्यंत विविध प्रकारच्या व्यवसायांमुळे अदानी यांना हे यश मिळाल्याचे "फोर्ब्स'ने नमूद केले आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला पुन्हा अपघात; मोठा अनर्थ टळला

अझीम प्रेमजी यांची घसरण 

यादीतील 14 श्रीमंतांची दौलत एक अब्ज डॉलरने कमी झाल्याची नोंदही येथे घेण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या यादीतील नऊ अब्जाधीशांची नावे यंदा यादीत नाहीत. प्रसिद्ध उद्योजक अझीम प्रेमजी यांच्या संपत्ती मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यांनी त्यांच्या संपत्तीमधील मोठा वाटा दान केला असल्याचे कारण या मागे आहे. यामुळे यादीत त्यांची घसरण झाली असून गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेले प्रेमजी यंदा 17 व्या क्रमांकावर गेले आहेत. 

Vidhan Sabha 2019 : मंत्रीच म्हणतात, मोदींच्या सभेला दुचाकीवर पाच-पाचजण बसा, बाकी मी बघतो (व्हिडिओ)

नवे सहा श्रीमंत 

यादीत सहा नव्या श्रीमंतांचा समावेश झाला आहे. यात 1.91 अब्ज डॉलर मालमत्ता असणारे बिजू रवींद्रन, 1.7 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह हल्दीराम ग्रुपचे मनोहरलाल ऊर्फ मधुसूदन आग्रवाल आणि स्वच्छतागृहातील साधनांसाठी लोकप्रिय "जग्वार' समूहाचे राजेश मेहरा यांचा समावेश आहे. 

आर्थिक मंदीचा फटका 

या वर्षी अनेक उद्योगपतींच्या संपत्तीत घट झाल्याचे दिसून आले. "फोर्ब्स'च्या पाहणीनुसार दिग्गज उद्योजकांच्या एकत्रित संपत्तीत आठ टक्‍क्‍यांनी घट होऊन ती 452 अब्ज डॉलर झाली आहे. देशातील आर्थिक मंदीमुळे श्रीमंतांसाठीही हे वर्ष आव्हानात्मक ठरले, असा निष्कर्ष या मासिकाने काढला आहे. 

देशातील पहिले दहा अब्जाधीश व त्यांची संपत्ती (अब्ज डॉलरमध्ये) 
1) मुकेश अंबानी ः 51.4 
2) गौतम अदानी ः 15.7 
3) हिंदुजा बंधू ः 15.6 
4) पालनजी मिस्त्री ः 15 
5) उदय कोटक ः 14.8 
6) शिव नाडर ः 14.4 
7) राधाकृष्णन दमानी ः 14.3 
8) गोदरेज समूह ः 12 
9) लक्ष्मी मित्तल ः 10.5 
10) कुमार बिर्ला ः 9.6


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forbes India Rich List 2019 Mukesh Ambani tops for 12th straight year