Mumbai News : डिसेंबरमध्येही परदेशी गुंतवणूकदारांची; भारतीय शेअरबाजारात खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

foreign investors Buying in Indian stock market finance investment

Mumbai News : डिसेंबरमध्येही परदेशी गुंतवणूकदारांची; भारतीय शेअरबाजारात खरेदी

मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्यावर्षी नोव्हेंबर पाठोपाठ डिसेंबर महिन्यातही भारतीय शेअर बाजारात पैसे गुंतवले आहेत. अर्थात नोव्हेंबर पेक्षा त्यांनी डिसेंबर मध्ये गुंतवलेली रक्कम चांगलीच कमी झाली आहे.

डिसेंबर मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी ३६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गुंतवली होती. तर डिसेंबर महिन्यात त्यांनी ११ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गुंतवली.

जगातील काही देशांमध्ये कोविड पुन्हा डोके वर काढत असूनही गुंतवणूकदारांनी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात पैसे गुंतवल्याच्या घटनेस महत्त्व दिले जात आहे. मात्र डिसेंबर मध्ये हे गुंतवणूकदार सावध झाल्याचेही आकडेवारीतून दिसत असल्याचे मॉर्निंगस्टार इंडियाचे सहसंचालक हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले.

अर्थात तरीही २०२२ या वर्षभरात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात सव्वा लाखकोटी रुपयांचे शेअर विकल्याची नोंद आहे. त्यापूर्वीच्या दोन वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात जास्त गुंतवणूक केली होती.

२०२० मध्ये त्यांनी पावणे दोन लाखकोटी रुपयांची तर २०२१ मध्ये त्यांनी पंचवीस हजार कोटी कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. भारतीय रुपयाची घसरण आणि अमेरिकेत झालेली व्याजदरवाढ यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी या वर्षात विक्री केली, असे जिओजित फायनान्स सर्विसचे व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले.

आता डॉलर इंडेक्स हळूहळू खाली घसरत असून हाच कल कायम राहिला तर या वर्षातही परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदीच करतील असेही त्यांनी दाखवून दिले. येत्या काही महिन्यांचा अंदाज घेतला तर परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करतच राहतील मात्र ती टप्प्याटप्प्यात करतील असेही श्रीवास्तव म्हणाले.

तर परदेशी गुंतवणूकदार काय धोरण स्वीकारतील हे अमेरिकी फेडरल बँकेची धोरणे, कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर आणि युरोपातील युद्धजन्य परिस्थिती आदींवर अवलंबून राहील असे बजाज कॅपिटलच्या संजीव बजाज यांनी सांगितले.