IPO : येत्या आठवड्यात चार कंपन्यांचे ‘आयपीओ’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ipo

IPO : येत्या आठवड्यात चार कंपन्यांचे ‘आयपीओ’

मुंबई : दिवाळीनंतर शेअर बाजारात चैतन्याचे वातावरण असून, अनेक कंपन्या प्रारंभिक शेअर विक्री अर्थात आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात पदार्पण करण्यास सज्ज झाल्या आहेत. येत्या आठवड्यात फ्यूजन मायक्रो फायनान्स कंपनी, डीसीएस सिस्टीम, ग्लोबल हेल्थ लिमिटेड, बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड या चार कंपन्या आयपीओ दाखल करणार असून, सुमारे ४५०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी अनेक कंपन्यांनी आयपीओद्वारे विक्रमी निधी मिळवला होता, मात्र जागतिक अस्थिरतेमुळे यंदा त्या तुलनेत गुंतवणूकदार आणि कंपन्यांकडूनही आयपीओला कमी प्रतिसाद मिळाला. वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये केवळ तीन कंपन्यांनी बाजारात आयपीओ दाखल केले. त्यानंतर मात्र यात वाढ दिसून आली. वर्ष २०२२ मध्ये आतापर्यंत, आयपीओच्या माध्यमातून कंपन्यांनी ४४,०८५ कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. मार्चपासून आतापर्यंत १९ कंपन्यांनी हिस्सा विक्रीतून निधी उभारला आहे. वर्ष २०२१ मध्ये ६३ कंपन्यांनी भांडवली बाजारातून विक्रमी १.१९ लाख कोटींचा निधी उभारला होता.

फ्युजन मायक्रो फायनान्स कंपनी

नवी दिल्ली स्थित मायक्रो फायनान्स कंपनी फ्युजन मायक्रो फायनान्स कंपनी येत्या दोन नोव्हेंबर ते चार नोव्हेंबर दरम्यान आपला आयपीओ दाखल करणार आहे. ६०० कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणि १.३७ कोटी शेअरची ऑफर फॉर सेलचा यात समावेश आहे. कंपनीने शेअर विक्री किंमत पट्टा प्रत्येकी ३५०-३६८ रुपये निश्चित केला आहे. गुंतवणूकदार किमान ४४ शेअर आणि नंतर त्याच्या पटीत बोली लावू शकतात.

डीसीएक्स सिस्टीम

विद्युत तारा निर्माती कंपनी डीसीएक्स सिस्टीम लिमिटेड येत्या ३१ ऑक्टोबर रोजी आयपीओ विक्रीसाठी खुला करणार असून प्रत्येकी १९७ ते २०७ रुपये किमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. दोन नोव्हेंबपर्यंत होणाऱ्या या भागविक्रीतून ५०० कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची अपेक्षा आहे. गुंतवणूकदारांना किमान ७२ शेअर आणि त्यानंतरच्या ७२ च्या पटीत बोली लावता येईल. ११ नोव्हेंबरला शेअर बाजारात नोंदणी होईल.

बिकाजी फूड्स इंटरनॅशनल

तयार खाद्यपदार्थ क्षेत्रातील बिकाजी फूड्स इंटरनॅशनलला २.९३ कोटी शेअरच्या विक्रीतून ९०० कोटींचा निधी उभारण्याची अपेक्षा आहे. तीन ते सात नोव्हेंबरदरम्यान आयपाीओ विक्रीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

ग्लोबल हेल्थ लिमिटेड

मेदान्ता रुग्णालयाची मालकी असलेली ग्लोबल हेल्थ लिमिटेड कंपनी येत्या तीन नोव्हेंबरपासून आयपीओ विक्री खुली करणार असून ती ७ नोव्हेंबरपर्यंत चालेल. प्रति शेअर किंमत पट्टा ३१९ रुपये ते ३३६ रुपये असून आयपीओच्या माध्यमातून कंपनी ५०० कोटी रुपये मूल्याच्या नवीन शेअरची विक्री करणार असून सध्याच्या भागधारकांकडील ५.०८ कोटी शेअरही उपलब्ध होतील. ‘सेबी’ने एकंदर ९४,००० कोटी रुपयांच्या निधी उभारणीसाठी ६४ कंपन्यांच्या ‘आयपीओ’ला मान्यता दिली आहे.

तर ४५ कंपन्यांनी ६५,००० कोटी रुपयांचा निधी उभारणीसाठी गेल्या वर्षी ‘सेबी’कडे प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र त्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. आधार हाउसिंग, आर्चियन केमिकल, फेडबँक फायनान्शिअल, एशियानेट सॅटेलाइट, भारत एफटीएच, बिबा, केपिलरी, कॉजेंट ई-सेवा आदी कंपन्यांच्या प्रस्तावाला ‘सेबी’च्या मान्यता मिळाली आहे, तर बोट, फार्मइझी, ड्रूम, उडान, मोबिक्विक यांनी आयपीओ आणण्याची योजना पुढे ढकलली आहे.