दरवाढीमुळे खरेदीदार धास्तावले, देशातील इंधन खपाचे आकडे होतायत कमी

कृष्ण जोशी
Tuesday, 2 March 2021

दरवाढ अशीच सुरू राहिली तर या खपावर आणखी परिणाम होईल अशी भीतीही व्यक्त होत आहे. 

मुंबई, ता. 2 : एकीकडे देशातील इंधनाच्या किमती आभाळाला भिडत असताना त्याचा परिणाम म्हणून पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचा खपही फेब्रुवारी महिन्यात (मागीलवर्षीच्या तुलनेत) कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर या खपावर आणखी परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त होत आहे. 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीन कंपन्या देशांतर्गत पेट्रोल-डिझेल या इंधनाची विक्री करतात. त्यांच्याकडील आकडेवारीनुसार फेब्रुवारीत हा खप कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे लावलेला लॉकडाऊन उठल्यानंतर ऑगस्टपासून इंधनाचा खप हळुहळू वाढत होता. मात्र त्या वाढीत फेब्रुवारी महिन्यात खंड पडला आणि मागील वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत या फेब्रुवारीत इंधनाचा खप कमी झाला असे आकडेवारी सांगते. 

महत्त्वाची बातमी : हुक्का पार्लर सुरु दिसलं तर पोलिसांवरच होणार कारवाई, अनिल देशमुखांचं मोठं विधान

फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत यावर्षीच्या फेब्रुवारीत पेट्रोलचा खप दोन टक्के तर डिझेलचा खप 8.6 टक्के कमी झाला. फेब्रुवारी 2020 पर्यंत कोरोनाची टाळेबंदी नसल्याने इंधनाचा खप उच्चांकी स्तरावर होता. त्यावर्षाच्या तुलनेत तो यावर्षी प्रथमच फेब्रुवारीत घसरला आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये पेट्रोलचा खप दोन हजार 264 टीएमटी (थाऊजंड मेट्रिक टन) होता. तर यावर्षीच्या फेब्रुवारीत तो दोन हजार 219 टीएमटी झाला आहे. तर डिझेलचा खप मागीलवर्षीच्या फेब्रुवारीत सहा हजार 356 टीएमटी होता, तो फेब्रुवारी 2021 मध्ये पाच हजार 811 टीएमटी एवढा झाला आहे. हा खप कमी का झाला असावा याचीही वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. 

मागीलवर्षीच्या फेब्रुवारीत लीप इयर असल्याने 29 दिवस होते, हे एक छोटे कारण असले तरी सध्या मोठ्या प्रमाणावर झालेली इंधन दरवाढ हे यामागील प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. सध्या देशाच्या अनेक भागात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली असून डिझेलचे दरही त्या आसपास आले आहेत. त्याचाही परिणाम वाहनांच्या वापरावर आणि पर्यायाने इंधनाच्या खपावर झाल्याचे तज्ज्ञ दाखवून देत आहेत. तर डिझेलच्या वापरणाऱ्या उद्योगांनीदेखील त्याच्या किमती वाढल्याने ते वापरण्याऐवजी नॅफ्ता वा अन्य इंधने वापरण्यास सुरुवात केल्याचेही सांगितले जात आहे.

मोठी बातमी : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा 'स्पाईक', कोरोनाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक

त्यामुळेही डिझेलचा वापर कमी झाला आहे. तर अजूनही सार्वजनिक वाहतूक कोविडच्या आधीएवढी सुरु झाली नसल्यानेही इंधनाचा खप कमी असल्याचे दाखवण्यात येत आहे. सरकार मुद्दामच इंधनाचे भाव चढे ठेवते, त्यामुळे करांचे जादा उत्पन्न सरकारला मिळते, असे अर्थतज्ज्ञ सांगतात. मात्र आता चढ्या दराच्या इंधनामुळे खप कमी झाला तर सरकारचा हेतू साध्य होईल का, अशीही शंका व्यक्त होत आहे.

fuel pries hike in india sales figures of bharat petroleum indian oil dropped in last few months 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fuel pries hike in india sales figures of bharat petroleum indian oil dropped in last few months