रुपया घसरणीचा आयटी कंपन्यांना फायदा 

रुपया घसरणीचा आयटी कंपन्यांना फायदा 

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच असून रुपया नवीन नीचांकी पातळी गाठतो आहे.  एका सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत 72.11 या सर्वोच्च नीचांकी पातळीपर्यंत पोचला. मात्र त्यात नंतर किंचित सुधारणा झाली. रुपयातील घसरणीचा परिणाम शेअर बाजारावर देखील दिसून आला. शेअर बाजारात देखील सलग सहा सत्रात घसरण झाली. मात्र अशा परिस्थितीचा शेअर बाजारातील एका 'सेक्टर'मधील कंपन्यांना मात्र फायदा झाला आहे. सध्याच्या काळात आयटी कंपन्यांच्या शेअरवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी 'आयटी' कंपन्यांनी आपले तिमाही निकाल जाहीर केले. मात्र ते अतिशय उत्साहवर्धक नव्हते. शिवाय गेल्या काही दिवसांमध्ये आयटी कंपन्यांमध्ये टीसीएस, इन्फोसिस वगळता इतर आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ झालेली नव्हती. आता मात्र आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर तर काही शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्याजवळ व्यवहार करत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयातील वाढत चाललेली घसरण आयटी कंपन्यांना फायदेशीर ठरली आहे. नजीकच्या काळात देखील रुपयात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 

* शेअर बाजाराच्या दृष्टीकोनातून 

शेअर बाजाराच्या दृष्टीकोनातून विचार करावयाचा झाल्यास मात्र या दरम्यानच्या काळात आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू इच्छिणार्‍या नवीन गुंतवणूकदारांना बरीच संधी दिली आहे. गेल्या वर्षभरात आयटी कंपन्यांचे शेअर एका विशिष्ट पातळीत व्यवहार करत होते. आता मात्र आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरले.

आयटी क्षेत्रातील कंपन्या 

कंपनी      चालू वर्षातील उच्चांक    चालू वर्षातील नीचांक    सध्याचा शेअरचा बाजारभाव (7 सप्टेंबर 2018)

टीसीएस          3,674.80                         1,711.15                 2,079.30
विप्रो                334                               253.50                    326.10       
इन्फोसिस       748.50                            436.83                     732.40
एचसीएल टेक    1,108.00                       824.85                   1,074.80
टेक महिंद्रा         780.00                        421.00                      771.35    
ओरॅकल फिन      4,379.20                  3,431.60                    4,060.00
केपीआयटी             314.50                  112.05                      310.10
माइंडट्री             1,174.90                  439.05                          1,155

वरील आकडेवारीचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येईल की, सध्या आयटी कंपन्यांचे शेअर त्यांच्या वर्षभरातील नीचांकी पातळीपासून साधारण दीड पटीने वधारले आहेत.

(शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय आर्थिक सल्लागाराच्या मदतीने आणि स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com