सोन्याच्या भावातील तेजी कायम 

पीटीआय
Tuesday, 24 December 2019

जागतिक पातळीवर वधारलेले भाव आणि वाढलेली मागणी यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या भावातील तेजी मंगळवारी कायम राहिली. दिल्लीत आज सोन्याचा भाव 191 रुपये आणि मुंबईत 164 रुपयांनी वधारला. 

नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील आर्थिक आणि राजकीय अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदार वर्षअखेरीच्या सुट्यांच्या आधी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्यात गुंतवणूक करीत आहेत. यामुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या भावातील वाढीचे सत्र कायम आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव प्रतिऔंसला 1 हजार 491 डॉलरवर गेला. याचवेळी चांदीचा भावही वधारून प्रतिऔंस 17.60 डॉलरवर गेला, अशी माहिती एचडीएफसी सिक्‍युरिटीजचे वरिष्ठ विश्‍लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिली. 

जागतिक पातळीवर भावात वाढ सुरू असतानाच नाताळच्या पार्श्‍वभूमीवर देशांतर्गत पातळीवर सोन्याला मागणी वाढली आहे. यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 191 रुपयांची वाढ होऊन 39 हजार 239 रुपयांवर गेला. याचबरोबर चांदीचा भाव प्रतिकिलोमागे तब्बल 943 रुपयांनी वाढून 47 हजार 146 रुपयांवर गेला. 

मुंबईतही भाव वधारले 
मुंबईतीस सराफा बाजारपेठेतही आज सोने आणि चांदीच्या भावातील वाढ कायम राहिली. सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 164 रुपयांनी वधारून 38 हजार 445 रुपयांवर गेला. याचवेळी चांदीचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 595 रुपयांची वाढ होऊन 45 हजार 630 रुपयांवर पोचला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold jumps on positive global trends