
Gold : पाच दिवसांत सोने दीड हजारांनी घसरले; हा आहे नागपुरातील दर
नागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या भावात झालेल्या घसरणीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात बुधवारी मोठी घसरण झाली. गेल्या पाच दिवसांत सोने दीड तर चांदीच्या दरात ४,१०० रुपयांनी घट झाली आहे. उपराजधानीत सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला ४६,६०० रुपयांवर, तर चांदीचा भाव प्रति किलोला ६३,५०० रुपयांवर आला होता. ग्राहकांना सध्या सोने खरेदीची चांगली संधी आहे.
पाच दिवसांपूर्वी सोन्याचा भाव दहा ग्रॅमला ४८,१०० तर चांदीचा भाव प्रति किलोला ६७ हजार ६०० रुपयांवर आले आहे. अमेरिकेतील रोजगाराच्या बाजारपेठेसंदर्भातील अहवाल अपेक्षेपेक्षा चांगला आल्याने आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत शुक्रवारपासून सोने-चांदीमध्ये विक्री होताना दिसत आहे. त्यामुळे दोन्ही धातूंचे भाव घसरत चालले आहेत.
कोरोना संकटातून सावरलेली अमेरिकन अर्थव्यवस्था आणि फेडरल रिझर्व्हने दरवाढीचे दिलेले संकेतामुळे बडे गुंतवणूकदार सोन्यातून गुंतवणूक काढून घेत आहे. त्यामुळे कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये मोठी पडझड होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव ४८ हजारांवरून आणि चांदीचा भाव ७० हजारांवरून खाली येताना दिसत आहे. शेअर बाजार नवनवीन विक्रम करीत असताना सोने आणि चांदीच्या दरात घसरण झालेली आहे. ग्राहकांना सध्या सोने खरेदीची चांगली संधी आहे.