सोन्याच्या किमतीत मोठी घट; चांदीचे दरही घसरले 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्याने भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या व चांदीच्या दरांमधील घसरण सुरूच राहिली.

मुंबई - आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्याने भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या व चांदीच्या दरांमधील घसरण सुरूच राहिली. आज दरांमध्ये सुमारे आठशे ते नऊशे रुपयांची घट झाली. कोरोनाच्या फैलावामुळे अमेरिकी अर्थव्यवस्था अडचणीत आल्याने तिला बळ देण्यासाठी अर्थसाह्य केले जाईल, असे अमेरिकी फेडरल रिझर्व्हने जाहीर केले. त्यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्था बाळसे धरण्याच्या अपेक्षेने अमेरिकेत व आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सोन्यातील गुंतवणूक काढून घेण्यात आली. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात व भारतीय बाजारांमध्येही सोन्या-चांदीचे दर घसरले. 

दहा ग्रॅम सोन्याची किंमत आज बाजारात ६३६ रुपये कमी म्हणजे ५१ हजार ९८६ रुपये नोंदवली गेली; तर चांदीच्या किमतीतही ८६३ रुपये घट होऊन तिचा एक किलोचा दर ६७ हजार रुपयांच्या आसपास होता. मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमचा दर ५१ हजार ९९० रुपये होता, काल हाच दर ५२ हजार ९८० रुपये होता, आज त्यात ९९० रुपये घट झाली. दोन आठवड्यांपूर्वी सोन्याचा एक तोळ्याचा दर ५५ हजार ९२२ रुपये होता. 

हे वाचा - आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं घसरलं; भारतातही होऊ शकतो परिणाम

यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्वने काल अमेरिकेतील कंपन्यांचा मागील 3 महिन्यांचा आढावा काल जाहीर केला. यात आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे भाव 3 टक्क्यांनी उतरल्याचे स्पष्ट होत आहे. यादरम्यान डॉलरही मजबूत होत आहे, हे देखील एक कारण सोन्याचे भाव कमी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. सध्या येत असलेल्या कोरोनाच्या लशीबद्दलच्या सकारात्मक बातम्यांमुळे पुढील काही दिवसांत सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरतील, असे मत बँक ऑफ अमेरिकाच्या फंड मॅनेजरने केलं आहे. 

सोन्याच्या दराचा आपण इतिहास पाहिला तर, सोने नेहमी जागतिक संकटाच्या वेळेस महागलं आहे. यामध्ये मग 70 च्या दशकांतील जागतिक युध्दपरिस्थिती असेल किंवा अरब युध्दाचा प्रसंग असो, याकाळात सोने मोठ्या प्रमाणात महागले होते. सध्या कोरोनामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी अस्थिरता दिसत आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीच बाजारात सोन्याचे दर 2500 हजार डॉलरपर्यंत जातील, असं तज्ञांनी सांगितलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold rate today 20 august silver price down