Gold Prices: तीन दिवसांत 2 वेळा सोन्याचे दर घसरले; आजही सोने, चांदीच्या दरात घट

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 11 November 2020

जागतिक पातळीसोबतच भारतातही सोने आणि चांदीच्या भावात घट झाली आहे.

नवी दिल्ली: जागतिक पातळीसोबतच भारतातही सोने आणि चांदीच्या भावात घट झाली आहे. एमसीएक्सवर आज सोने 0.15 टक्क्यांनी उतरून प्रति 10 ग्रॅमला 50 हजार 425 रुपयांपर्यंत  आले आहे. तर चांदीच्या प्रतिकिलो दरात 0.35 टक्क्यांनी घट होऊन दर 62 हजार 832 रुपयांपर्यंत आले आहे. मागील तीन दिवसांत सोन्याच्या दर दुसऱ्यावेळेस घसरल्या आहेत.

जागतिक बाजारपेठेतील किंमती-
जागतिक बाजारपेठेत कोरोनाचा मोठा परिणाम जाणवत आहे. जागतिक बाजारात स्पॉट सोने 0.2 टक्क्यांनी वाढून 1829.31 डॉलर प्रति औंस झाले, तर चांदीचे दर 0.2 टक्क्यांनी वाढून 24.26 डॉलरवर गेले होते. अमेरिकन डॉलर उतरल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली होती. डॉलरचा निर्देशांक 0.11 टक्क्यांनी घसरल्याने इतर चलन असणाऱ्या देशांना याचा फायदा झाला आहे.

Share Market: आतापर्यंतची सर्वोत्तम सुरुवात! पहिल्यांदाच सेन्सेक्स 43 हजारांपेक्षा जास्त अंशांनी उघडला

मागील सत्रात सोन्याचे दर 1.4 टक्के म्हणजे 700 रुपयांनी वाढले होते. तर चांदीचे दर 3.3 म्हणजे 2 हजार रुपयांनी वाढले होते. अमेरिकच्या निवडणुकीत सत्तांतर झाल्यामुळे सोन्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढण्याची शक्‍यता आहे. अनेकांनी पन्नास टक्‍के पैसे देऊन ॲडव्हान्स दागिने खरेदी केले. दिवाळीच्या मुहूर्तावर ते दागिने मिळणार आहेत. 

31 टक्क्यांनी वाढले दर- 
भारतात 2020 मध्ये जागतिक पातळीनुसार सोन्याच्या किमती 31 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ऑगस्टमध्ये भारतात सोन्याच्या दराने 56 हजार 200 चा विक्रमी उच्चांक गाठला, तर चांदी प्रति किलो 80 हजारांपर्यंत गेल्या रुपयांच्या आसपास होती. सणासुदीच्या काळात भारतात सोन्याची मागणी वाढेल अशी आशा विश्लेषकांनी व्यक्त केली.

कर्ज घेण्यासाठी सर्वात चांगली संधी, जाणून घ्या व्याजदरातील नवीन बदल

दसऱ्यानंतर आता धनत्रयोदशीचा मुहूर्त साधण्यासाठी लोकांची पुन्हा एकदा सोने व चांदी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे. दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेता आणि कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने अनेकांनी विक्रेत्यांकडे सोने चांदीच्या दागिन्यांची पूर्वनोंदणी सुरू केलेली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold rates slumps two times in last three days