Gold Price - सोन्याच्या दरात घसरण सुरूच; चांदीही झाली स्वस्त

टीम ई सकाळ
Monday, 14 December 2020

भारतीय सराफ बाजारात सोमवारी पुन्हा सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळाली. तसंच चांदीचे दरही कमी झाले आहेत. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यानंतर सातत्याने दर कमी होत आहेत.

नवी दिल्ली - भारतीय सराफ बाजारात सोमवारी पुन्हा सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळाली. तसंच चांदीचे दरही कमी झाले आहेत. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यानंतर सातत्याने दर कमी होत आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दरात थोडी वाढ झाली होती मात्र पुन्हा सोनं स्वस्त होत आहे.

दिल्लीतील सराफ बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात 460 रुपयांची घट झाली. तर चांदीचे दरही एक किलोमागे 629 रुपयांनी कमी झाले आहेत. याआधी सोन्याचा दर 48 हजार 831 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता तर चांदी 63 हजार 98 रुपये प्रति किलो इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाल्यानं भारतातही सोनं चांदी स्वस्त झाले आहेत.

सोमवारी सोन्याचा दर 460 रुपयांनी कमी होऊन प्रति दहा ग्रॅम 48 हजार 371 रुपये इतका झाला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर कमी होऊन तो 1830 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. 

हे वाचा - सोनं 42 हजारापर्यंत होऊ शकतं स्वस्त 

चांदीच्या दरातही घसरण झाली असून दिल्लीतील सराफ बाजारात प्रति किलोमागे 629 रुपये दर कमी झाले आहेत. यामुळे आता चांदीचे दर 62 हजार 469 रुपये प्रतिकिलो इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 23.82 डॉलर प्रति औंस इतका आहे.

गुरवारच्या तुलनेत सोन्याचे दर शुक्रवारी 94 रुपयांनी कमी झाले होते. यामुळे सोन्याचा दर 49 हजार 97 रुपये प्रति दहा ग्रॅम असा झाला होता. नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घट झाली. तर डिसेंबरमध्येही तसंच काहीसं चित्र आहे. पहिल्या आठवड्यात मात्र किंमतीत 490 रुपयांनी वाढ झाली होती. तर चांदी जवळपास 3 हजार रुपयांनी वधारली होती. 

हे वाचा - गोल्ड म्युच्युअल फंडातील सुवर्णसंधी

ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर 56 हजार 254 रुपयांवर पोहोचला होता. चांदी 76008 रुपये प्रति किलो इतकी झाली होती. त्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरू होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold rates today gold price silver rate jwellers