गुगलचे ‘प्ले पॉईंटस्‌’ भारतीय यूजर्ससाठी खुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google Play Points

Google Play Points : गुगलचे ‘प्ले पॉईंटस्‌’ भारतीय यूजर्ससाठी खुले

‘गुगल प्ले स्टोअर’ हे जगातील सर्वात लोकप्रिय अॅप स्टोअर आहे. यावर गेम, चित्रपट, ई-पुस्तके अशा गोष्टी विभागणीनुसार क्षणार्धात ॲप्स डाऊनलोड करता येतात. स्टोअरवरील उपलब्ध असलेल्या गोष्टी ‘विनामूल्य’ बरोबरच पैसे भरून ‘प्रीमियम’ स्वरूपात मिळतात. परंतु हे माहीत असू द्या की, यापुढे ‘प्रीमियम’ अॅप्स खरेदी केल्यानंतर बक्षिसेही मिळतील. होय, गुगलने ‘गुगल प्ले पॉईंटस्‌’ (Google Play Points) हा प्रोग्राम आता भारतात लॉन्च केला आहे. या अंतर्गत ‘मिनीक्लिप’चे (Miniclip) आठ बॉल पूल आदी जागतिक गेम कंपन्यांशी भागीदारी केली आहे. भारताची कंपनी गेमेशन लुडो किंगदेखील गुगलसोबत भागीदारीत आहे.याशिवाय ट्रूकॉलर (Truecaller) आणि व्यासा (Wysa) या कंपन्यादेखील सहभागी झाल्यात.

याअंतर्गत, युजर्सना प्ले स्टोअरवरून अॅप्स, गेमिंग, चित्रपट आणि ई-बुक्स खरेदी करण्यासाठी ‘रिवॉर्ड’ पॉईंटस्‌ दिले जातील. ‘प्ले पॉईंटस्‌’चे चार स्तर आहेत, की ज्यामध्ये ‘ब्रॉन्झ’, ‘सिल्‍व्हर’, ‘गोल्ड’ आणि ‘प्लॅटिनम’ यांचा समावेश आहे. हे रिवॉर्ड पॉईंटस्‌ कलेक्शननुसार उपलब्ध होतील, आणि हे पॉईंटस्‌ ‘गुगल प्ले क्रेडिट’द्वारे वापरले जाऊ शकतात.

हा एक असा प्रोग्राम आहे, ज्याद्वारे यूजर्सना प्ले स्टोअरवरून केलेल्या खरेदीसाठी पॉईंटस्‌ आणि रिवॉर्ड मिळतात. हे अ‍ॅप्स आणि गेमपासून अ‍ॅप खरेदी केल्यानंतर मिळतील आणि स्तरानुसार बक्षिसेदेखील वाढत जातात. हे लक्षात असू द्या की, प्ले पॉईंटस्‌ हे प्ले स्टोअरद्वारे केलेल्या अॅप-मधील खरेदीसाठीच लागू आहेत.

ब्रॉन्झ स्तरापासून सुरुवात केल्यास खर्च केलेल्या प्रत्येक डॉलरसाठी (हे अमेरिकेसह अन्य देशांसाठीचे आहेत) एक पॉईंट मिळतो. एकदा १५० पॉईंटस्‌ मिळवले की, ‘सिल्व्हर’ स्तरावर जाता, तिथे रिवॉर्ड १.१ पॉईंटस्‌ प्रति डॉलर मिळते. ६०० पॉईंटस्‌वर पोहोचल्यावर ते ‘गोल्ड’ स्तरावर जाऊन प्रतिडॉलर १.२ पॉईंटस्‌पर्यंत वाढतात, तसेच ‘प्लॅटिनम’ या चौथ्या स्तरामध्ये ३ हजार आणि त्याहून अधिक पॉईंटस्‌वर गेल्यावर १.४ पॉईंटस्‌ प्रतिडॉलर फायदा होतो.

एकदा अधिक पॉईंटस्‌ कलेक्शन केले की, यूजर्स ते गुगल प्ले क्रेडिटसाठी वापरण्यासाठी ‘रिडीम’ करू शकतात, जसे अॅपमधील किंवा गेममधील गोष्टी सवलतीच्या दरात खरेदी करताना अथवा विशेष अॅपमधील गोष्टी किंवा कूपनवर खर्च करू शकता. भारताचा विचार केल्यास गुगलने अद्याप हे स्पष्ट केलेले नाही की भारतीय रुपयांसाठी पॉईंटस्‌ कसे मिळतील. मात्र, ते लवकरच जारी केले जाऊ शकतात.

सहभाग कसा घ्यायचा?

गुगलच्या ‘प्ले पॉईंटस्‌’मध्ये अँड्रॉईड यूजर्सना सहभागी होता येईल. यासाठी प्ले स्टोअरमध्ये वरच्या कोपऱ्यातील प्रोफाईलवर क्लिक करावे लागेल. यानंतर, उजव्या बाजूला ‘प्ले पॉईंटस्’ (Play Points) वर क्लिक करावे लागेल. यामध्ये सहभागी होणारे यूजर्स पहिल्या आठवड्यात पाच वेळा पॉईंटस्‌ मिळवू शकतात.