कोरोना भारतासाठी ठरणार फायदेशीर; चीनला मागे टाकण्याची संधी

गौरव मुठे
Saturday, 18 April 2020

परदेशी कंपन्या आता भारताकडे नवीन पर्याय म्हणून बघत आहे. भारतामध्ये उत्पादनाचे नवीन जागतिक केंद्र बनण्याची क्षमता देखील आहे. 

पुणे Coronavirus : कोविड-19 ने जगभर घातलेल्या थैमानामुळे जगभरातील उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगाच्या पुरवठा साखळीला धक्का बसला आहे. वुहान हे जगातील पुरवठा साखळीतील महत्त्वाचे शहर आहे. सुमारे तीन महिने शहरात लॉकडाऊन असल्यामुळे जागतिक कंपन्यांच्या चीनमधील उत्पादन प्रकल्पांना 'ब्रेक' लागला आहे. परिणामी आता या मल्टिनॅशनल कंपन्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. परदेशी कंपन्या आता भारताकडे नवीन पर्याय म्हणून बघत आहे. भारतामध्ये उत्पादनाचे नवीन जागतिक केंद्र बनण्याची क्षमता देखील असल्याने परदेशी कंपन्यांना भारत आकर्षित करतो आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताचा फायदा
चीननंतर सर्वाधिक मनुष्यबळ भारतात उपलब्ध आहे. शिवाय 'मेक इन इंडिया'अंतर्गत भारतात उद्योगांना प्रोत्साहन दिले जाते आहे. आता कोरोना यासाठी इष्टापत्ती ठरण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियाच्या कंपन्या चीनमधील उत्पादन प्रकल्प भारतात आणण्यास उत्सुक आहेत. ह्युंदाई स्टील, पोस्को यासंदर्भात भारत सरकारबरोबर चर्चा करत आहेत. चीनने नियंत्रित केलेल्या अर्थव्यवस्थेत पुढील वाटचाल करणे अवघड ठरत असल्याने अधिकाधिक कोरियन कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. चीनऐवजी त्या भारतासारख्या अनुकूल ठिकाणांच्या शोधात आहेत.

आणखी वाचा - पाकिस्तानात मौलवी वाढवताय डोकेदुखी

 कोरियन कंपन्यांच्या  उत्पादनांसाठी भारत जागतिक उत्पादन केंद्र ठरू शकतो. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धामुळे निर्माण होत असलेल्या तणावामुळे अनेक दक्षिण कोरियन कंपन्या चीनमधून प्रकल्प भारतात आणण्याच्या विचारात आहेत. चेन्नई येथील कोरियन दूतावास अधिकाऱ्यांशी चीनमध्ये प्रकल्प असलेल्या अनेक कंपन्यांचे अधिकारी चर्चा करत आहेत. यासंदर्भात काही कंपन्यांची चर्चा प्राथमिक स्तरावर आहे तर काही कंपन्यांच्या चर्चा पुढील पातळीवर सरकल्या आहेत. आमच्याकडे पोलाद आणि लोखंड उत्पादन कंपन्यांची भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातील विनंती आली आहे, अशी माहिती दक्षिण कोरियाच्या भारतासाठीच्या डेप्युटी कॉन्स्युलेट जनरल युप ली यांनी दिली आहे.  जपानप्रमाणेच भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचा विचार दक्षिण कोरिया करते आहे. याआधी दक्षिण कोरियाने बहुतांश उत्पादन प्रकल्प चीनमध्येच सुरू केले होते. आता मात्र द. कोरियाला झालेली चूक लक्षात येऊ लागली आहे. कोविड-19 मुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या संकटामुळे ही प्रक्रिया धीमी झाली आहे. जपानी कंपन्या देखील चीनमधून आपले प्रकल्प भारतात आणू इच्छितात त्यांचे भारताने स्वागत केले पाहिजे. जपान चीनमधून 2 अब्ज डॉलरची गुंतवणूक काढून भारतात आणू इच्छितो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 चीनमधून प्रकल्प भारतात आणणाऱ्या कंपन्यांचे स्वागत भारताने केले पाहिजे. परदेशी कंपन्यांसाठी भारत सरकारने स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. कंपन्यांना 'स्पेशल इकॉनॉमिक झोन'मध्ये जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
- दिपक पारेख, अध्यक्ष, एचडीएफसी बॅंक

परकी गुंतवणूक आकर्षित होणार
चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दक्षिण कोरियाच्या कंपन्यांबरोबरच इतरही कंपन्या भारतात येण्यास उत्सुक आहेत. शिवाय काही कंपन्यांनी चीनमधील उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयफोनसारखी जागतिक कंपनी देखील चीनमधील उत्पादन कमी करून भारतात उत्पादन वाढविण्याचा विचारात आहे. परदेशी कंपन्यांना भारतातील उत्पादन वाढवायचे असल्याने  परदेशी कंपन्या भारतातील उत्पादन प्रकल्पांची क्षमता वाढवू इच्छित आहेत. परिणामी परकी गुंतवणूक भारतात वाढण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परदेशी कंपन्या भारतात उद्योग आणण्यास का उत्सुक आहेत?

 • अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे मोठी झळ इतर देशांच्या कंपन्यांना बसली आहे.
 • भारतात उद्योग व्यवसायासाठी वाढते अनुकूल धोरण
 • मुबलक कुशल मनुष्य बळ
 • चीन नियंत्रित अर्थव्यवस्था परदेशी कंपन्यांसाठी घातक

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दक्षिण कोरिया भारताकडे आकर्षित होण्याची कारणे 

 • दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था निर्यातीवर आधारित आहे. चीन, अमेरिका आणि रशिया हे महत्त्वाचे भागीदार आहे. मात्र या देशांमध्ये बिघडलेल्या परिस्थितीमुळे दक्षिण कोरियाला नुकसान झाले आहे. 
 • युक्रेन वादामुळे अमेरिकेने रशियावर व्यापारी प्रतिबंध लावले आहे. 
 • अमेरिकी-चीन व्यापार युद्धामुळे चीनच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणावर शुल्क लादण्यात आले  आहेत. 
 • चीन आणि रशिया दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे याचा परिणाम त्या देशातील दक्षिण कोरियाच्या कंपन्यांवर देखील झाला आहे. 
 • चीनमध्ये असलेल्या स्मार्टफोन कंपनी 'सॅमसंग' आणि वाहन निर्मिती केत्रतील ह्युंदाई या दक्षिण कोरियाच्या कंपन्यांच्या नफ्यात मोठी घसरण झाली आहे. 

चीनवरील अवलंबित्व कमी करणे 
चीनने बऱ्याचदा दक्षिण कोरियाचा राजकीय फायदा उठविण्याचा देखील प्रयत्न केला आहे. वर्ष 2017 मध्ये अमेरिकेने  उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया सीमेवर 'थाड' संरक्षण प्रणाली उभी केली. त्या वेळी चीनने विरोध करत दक्षिण कोरियाच्या निर्यातीवर निर्बंध आणले. 

आकडे बोलतात... 

 • भारताशी भागीदारी केल्यामुळे दक्षिण कोरियाला फायदा झाला आहे. 
 • दोन्ही देशांदरम्यान  20 अब्ज डॉलरचे द्विपक्षीय व्यापारी करार (वर्ष 2018-19)
 • वर्ष 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापारी करार 50 अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य
 • गेल्या तीन वर्षात ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्नॉलॉजी आणि इतर काही क्षेत्रात कोरियाकडून 3.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक 

दक्षिण कोरिया जगातील पाचवा मोठा निर्यातदार देश

 • निर्यात:   596 अब्ज डॉलरच्या वस्तू आणि सेवांची निर्यात (वर्ष 2017-18)
 • आयात : 471 अब्ज डॉलर 
 • अनुकूल व्यापार समतोल (बॅलन्स ऑफ ट्रेड): 125 अब्ज डॉलर 

भारत जगातील 17 वा मोठा निर्यातदार देश 

 • निर्यात:   292 अब्ज डॉलरच्या वस्तू आणि सेवांची निर्यात (वर्ष 2017-1८)
 • आयात : 417 अब्ज डॉलर 
 • प्रतिकूल व्यापार समतोल (बॅलन्स ऑफ ट्रेड): 125 अब्ज डॉलर
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gourav muthe writes about India opportunity after coronavirus