यावर्षी कोणतीही नवी सरकारी योजना नाही : अर्थमंत्री सीतारामन

वृत्तसंस्था
Friday, 5 June 2020

यावर्षी फक्त पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेड आणि आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या बाबींसाठीच खर्च केला जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात त्यामुळे कोणत्याही नव्या योजनेला मंजूरी दिली जाणार नसल्याचेही अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

यावर्षी कोणतीही नवी सरकारी योजना सुरू करण्यात येणार नाही, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर खर्चात कपात करण्याच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. अर्थमंत्रालयाकडे नव्या योजनांसंदर्भात विनंती पाठवू नये अशी सूचना सर्वच खात्यांना देण्यात आली आहे. 

स्टेट बँकेला 3,580 कोटींचा नफा; व्याजापोटी बँकेला 22 हजार  954 कोटीचे उत्पन्न

यावर्षी फक्त पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेड आणि आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या बाबींसाठीच खर्च केला जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात त्यामुळे कोणत्याही नव्या योजनेला मंजूरी दिली जाणार नसल्याचेही अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

कोविड-19 महामारीमुळे सार्वजनिक वित्तीय साधनांच्या मागणीत अभूतपूर्व अशी वाढ होऊ शकते आणि त्यामुळेच सर्व साधनांचा वापर बदलत्या परिस्थितीनुसार आणि प्राधान्यक्रमानुसार करण्याची आवश्यकता आहे, असे अर्थमंत्रालयाने आपल्या पत्रकात म्हटले आहे. ज्या योजनांना अर्थसंकल्पात मंजूरी देण्यात आली होती त्या योजनांदेखील 31 मार्चपर्यत स्थगित राहणार आहेत. 
या नव्या नियमाला अपवाद ठरणाऱ्या खर्चासाठी डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरची (खर्च विभाग) परवानगी घेणे आवश्यक असणार आहे, असेही अर्थमंत्रालयाने आपल्या सूचनेत म्हटले आहेत.

 म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका

देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर 11 वर्षांच्या नीचांकीवर आहे. तर मागील दहा दशकांतील सर्वात धीमी वाटचाल अर्थव्यवस्था करणार असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस या जागतिक पतमानांकन संस्थेने भारताचे पतमानांकनदेखील घटवले आहे. गुंतवणूकीसाठीचे सर्वात खालचे पतमानांकन भारताला देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

भविष्यात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासंदर्भातील वित्तीय धोरणे आणि पावले ही कोविड-19 महामारीशी निगडीत परिस्थितीवर अवलंबून असतील असे मागील महिन्यात अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारने याआधीच 20.97 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली आहे. यात रिझर्व्ह बँकेने 17 मेपर्यत उपलब्ध करून दिलेल्या 8.01 लाख कोटी रुपयांच्या चलन तरलतेचाही समावेश आहे. मागील काही दिवसांमध्ये देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील 24 तासात देशभरात 9,851 रुग्णांची आणि 273 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 2,26,770 वर पोचली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भारत आता अमेरिका, ब्राझिल, रशिया, इंग्लंड, स्पेन आणि इटलीनंतर सातव्या क्रमांकावर आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government will not approve any new scheme amid corona crisis