दुसऱ्या तिमाहीत विकासदर खालावण्याचे "एसबीआय'चे भाकीत 

दुसऱ्या तिमाहीत विकासदर खालावण्याचे "एसबीआय'चे भाकीत 

मुंबई : वाहन विक्रीतील घसरण, हवाई सेवा क्षेत्राची सुमार कामगिरी, प्रमुख पायाभूत क्षेत्रांचा संघर्ष, अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान आणि गुंतवणुकीचा ओघ आटल्याने चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकासदर आणखी खोलात जाईल, असे भाकीत "एसबीआय'ने केले आहे. दुसऱ्या तिमाहीत विकासदर 4.2 टक्‍क्‍यांपर्यंत घसरेल आणि वर्षभरासाठी तो 5 टक्के राहील, अशी भीती "एसबीआय'ने व्यक्त केली आहे. जागतिक पातळीवरील बड्या संस्थांपाठोपाठ "एसबीआय'ने विकासदराचा अंदाज घटवल्याने अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे. 

अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा आढावा घेणारा अहवाल "एसबीआय'ने मंगळवारी (ता. 12) जाहीर केला. ज्यात दुसऱ्या तिमाहीत विकासदर 4.2 टक्‍क्‍यांपर्यंत खाली येईल, असा अंदाज वर्तवला आहे. यंदा मान्सूनचे प्रमाण 110 टक्के राहिले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि पंजाब आदी राज्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे निरीक्षण "एसबीआय'ने नोंदवले आहे.

वृद्धीदर दर्शविणाऱ्या 33 दर्शकांची मार्चपासून घसरण झाली आहे. सप्टेंबरमध्ये ती 17 टक्‍क्‍यांपर्यंत घसरली. औद्योगिक उत्पादनातदेखील घट झाली आहे. ज्यामुळे अर्थचक्राची गती मंदावेल, असे मत "एसबीआय'ने व्यक्त केले आहे. चालू वर्षात विकासदर 5 टक्के राहील, असा नवा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी "एसबीआय'ने 6.1 टक्के विकासाचा अंदाज वर्तवला होता. 

सोयाबीन, भुईमूग, कपाशीचे नुकसान 

यंदाच्या हंगामात मान्सून सरासरीहून अधिक झाल्याने मध्य प्रदेशातील 40 ते 50 टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे. मध्य प्रदेशात तेलबियांचे सर्वाधिक उत्पादन होते. त्याशिवाय भुईमूग उत्पादनात 30 ते 40 टक्के घट होईल. गुजरातमधील अतिवृष्टीमुळे कपाशीच्या उत्पादनात 30 टक्के घट होण्याचा अंदाज "एसबीआय'ने व्यक्त केला आहे. 

विकासदराचा अंदाज कमी करणाऱ्या संस्था 

आशियाई विकास बॅंक, वर्ल्ड बॅंक, ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओसीईडी), रिझर्व्ह बॅंक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आदी संस्थांनी भारताचा चालू वर्षाचा विकासदर कमी केला आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com