स्मार्टफोन, छोट्या मोटारी स्वस्त होणार

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मे 2017

जीएसटी परिषदेने पाच, 12, 18, 28 टक्के अशी कररचना वस्तू आणि सेवांसाठी केली आहे. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, मिठाई आणि आइसक्रीम यांच्यावरील कर 22 टक्‍क्‍यांवरून 18 टक्‍क्‍यांवर आणण्यात आला आहे.

जीएसटी रचनेत कमी कर; शीतपेये, रेफ्रिजरेटर जादा करामुळे महागणार
नवी दिल्ली, ता. 28 (पीटीआय) : वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी जुलैपासून सुरू झाल्यानंतर शीतपेये आणि दूरचित्रवाणी संच, वॉशिंग मशिन आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तू महागणार आहेत. स्मार्टफोन, छोट्या मोटारी आणि दैनंदिन वापराच्या वस्तू मात्र स्वस्त होणार आहेत.

जीएसटी परिषदेने बाराशेपेक्षा अधिक वस्तू आणि पाचशे सेवांची करनिश्‍चिती केली आहे. यानुसार साबण आणि टूथपेस्ट स्वस्त होईल, तर ताजी फळे, भाज्या, डाळी, ब्रेड आणि ताजे दूध यांना जीएसटीत सवलत असेल. इकॉनॉमी क्‍लासचा विमान प्रवास किंचित स्वस्त होणार असून, टॅक्‍सी सेवाही स्वस्त होईल. या दोन्हींवरील कर जीएसटी रचनेत पाच टक्‍क्‍यांवर आणण्यात आला आहे. सध्या या सेवांवर सहा टक्के कर आहे. धान्यांवर कर नसल्याने ती स्वस्त होतील. सध्या काही राज्ये धान्यांवर दोन ते पाच टक्के खरेदी अधिभार आकारतात, आता तो जीएसटीमध्ये असणार नाही.

जीएसटी परिषदेने पाच, 12, 18, 28 टक्के अशी कररचना वस्तू आणि सेवांसाठी केली आहे. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, मिठाई आणि आइसक्रीम यांच्यावरील कर 22 टक्‍क्‍यांवरून 18 टक्‍क्‍यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे या वस्तू स्वस्त होतील. शॅम्पू, परफ्यूम आणि सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तूंवरील कर सध्या 22 टक्के आहे, तो 28 टक्‍क्‍यांवर नेल्याने या वस्तू महागणार आहेत. स्मार्टफोनवरील कर 12 टक्‍क्‍यांवर आणल्याने ते स्वस्त होतील. यासोबत पूजासाहित्याला जीएसटीतून सवलत देण्यात आली आहे.

करमणूक सेवांवरील कर कमी
करमणूक, केबल आणि डीटीएच सेवेवरील कर 18 टक्‍क्‍यांवर आणण्यात आला आहे. यामुळे या सेवा स्वस्त होतील. सध्या या सेवांवर 10 ते 30 टक्के करमणूक कर आणि 15 टक्के सेवाकर आकारण्यात येतो.

Web Title: gst bill smartphone cars prices to be cheaper