एप्रिलमध्ये जीएसटीचा महसूल एक लाख कोटींवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) सरकारी तिजोरीत एक लाख तीन हजार कोटींपेक्षा जास्त महसूल जमा झाला आहे. जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंतचे एप्रिलमधील हे सर्वाधिक करसंकलन आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून देशात आर्थिक घडामोडींना वेग आल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे मत जेटली यांनी व्यक्त केले. 

गतवर्षी 1 जूनला देशभरात जीएसटीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. 2017-18 या वर्षात जीएसटीतून सात लाख 41 हजार कोटी, तर मार्चमध्ये 89 हजार 264 कोटींचा महसूल मिळाला होता. एप्रिलमध्ये झालेल्या वाढीमुळे जीएसटी प्रणाली स्थिरावत असल्याचे चित्र दिसत आहे. एप्रिलमध्ये जीएसटीमधून एक लाख कोटींपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. ही मोठी कामगिरी आहे. त्यातून देशात आर्थिक घडामोडींना वेग येऊन मंदी नसल्याचे स्पष्ट होत आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे. सुधारलेले आर्थिक वातावरण, ई-वे बिल आणि जीएसटीचा वाढता अंवलब, अप्रत्यक्ष करात वाढ या पार्श्‍वभूमीवर हा ट्रेंड कायम राहील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

अर्थमंत्रालयाने आज जीएसटीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार एप्रिलमध्ये जीएसटीतून एक लाख तीन हजार 457 कोटींचा महसूल मिळाला आहे. यात सीजीएसटीतून 18 हजार 652 कोटी, एसजीएसटी 25 हजार 704 कोटी, आयजीएसटी 50 हजार 548 कोटी आणि सेसद्वारे आठ हजार 554 कोटींचा समावेश आहे. 

Web Title: GST revenues of one lakh crores in April