जगभरातील शेअर बाजारांत ‘हिलरी लाट’

पीटीआय
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

मुंबई - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांनी ‘एफबीआय’कडून दिलासा मिळाल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजी निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १८४ अंशांनी वाढून २७ हजार ४५८ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६३ अंशांनी वाढून ८ हजार ४९७ अंशांवर बंद झाला. 

मुंबई - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांनी ‘एफबीआय’कडून दिलासा मिळाल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजी निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १८४ अंशांनी वाढून २७ हजार ४५८ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६३ अंशांनी वाढून ८ हजार ४९७ अंशांवर बंद झाला. 

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्यावर खासगी ई-मेल सेवेचा वापर केल्याबद्दल गुन्हेगारी खटला दाखल होण्याची शक्‍यता होती. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ (एफबीआय) या अमेरिकी तपास यंत्रणेने हिलरी यांना खटल्याला सामोरे जावे लागणार नाही, असे आज स्पष्ट केले. यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजीचे वातावरण तयार झाले. 

सेन्सेक्‍स आज सकाळी २७ हजार ५९१ अंश या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोचला. मात्र, नंतर सुरू झालेल्या नफेखोरीच्या वातावरणामुळे त्यात घसरण होण्यास सुरवात झाली. अखेर मागील सत्राच्या तुलनेत त्यात १८४ अंशांची वाढ होऊन तो २७ हजार ४५८ अंशांवर बंद झाला. मागील पाच सत्रांत निर्देशांकात ६६७ अंशांची घसरण झाली होती. कॅपिटल गुड्‌स वळगता सर्व क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात आज १.९४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली.

आशियाई, युरोपीय बाजारांमध्ये तेजी 
लंडन - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांना दिलासा मिळाल्याने आशियाई आणि युरोपीय देशांतील शेअर बाजारांमध्ये सोमवारी तेजी निर्माण झाली. 

अमेरिकेच्या निर्देशांकांमध्ये सुरवातीच्या सत्रात आज १.३ टक्के वाढ झाली. तसेच, युरोपीय देशांतील जर्मनीच्या निर्देशांकात १.५, ब्रिटन १.३ आणि फ्रान्स १.७ टक्के वाढ झाली. आशियाई देशांतील जपानच्या निर्देशांकात १.६१, चीन ०.२६ आणि हाँगकाँग ०.७० टक्के वाढ झाली. हिलरी क्‍लिंटन यांची चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल होण्याची शक्‍यता ‘एफबीआय’ने व्यक्त केल्याने २८ ऑक्‍टोबरला जगभरातील शेअर बाजारांमध्ये पडझड झाली होती. तेव्हापासून शेअर बाजारांमध्ये घसरण सुरू आहे. आजच्या घडामोडींमुळे पुन्हा शेअर बाजारांमध्ये तेजी निर्माण झाली.

Web Title: Hillary wave in Stock markets around the world