होळी खेळताना नोटांना जपा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

रंगात माखलेल्या नोटा न स्वीकारण्याच्या रिझर्व्ह बॅंकेच्या बॅंकांना सूचना

रंगात माखलेल्या नोटा न स्वीकारण्याच्या रिझर्व्ह बॅंकेच्या बॅंकांना सूचना

मुंबई: रंगांमध्ये बेभान होऊन होळी खेळणाऱ्यांना यंदा रिझर्व्ह बॅंकेच्या नव्या धोरणामुळे विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. "आरबीआय"ने स्वच्छ चलनासंदर्भातील धोरणाची अंमलबजावणी केली आहे. त्यानुसार रंगामध्ये माखलेल्या अथवा खराब झालेल्या पाचशे आणि दोन हजारांच्या चलनी नोटा न स्वीकारण्याची सूचना बॅंकांना केली आहे. त्यामुळे रंगपंचमी खेळताना नोटांना रंग लागल्यास ग्राहकांना होळी चांगलीच महागात पडण्याची शक्‍यता आहे.
नोटाबंदी दरम्यान रिझर्व्ह बॅंकेने अर्थव्यवस्थेत पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या चलनी नोटा उपलब्ध केल्या आहेत. "क्‍लीन नोट पॉलिसी"अंतर्गत पाचशे आणि हजारांच्या नोटा रंगलेल्या अवस्थेत अथवा खराब असल्यास त्या स्वीकारू नयेत, अशी स्पष्ट सूचना आरबीआयने बॅंकांना दिली आहे. याआधीही नव्या चलनी नोटांवर खाडाखोड किंवा पेनाने लिहीलेले असल्यास त्या स्वीकारू नये, असे निर्देश बॅंकांना देण्यात आले होते. नोटा दिर्घकाळ टिकण्याच्यादृष्टीने बॅंकेकडून ही पावले उचलली जाणार आहेत. त्यामुळे होळी आणि धुलिवंदनाची मजा घेताना ग्राहकांना स्वत:बरोबरच नोटांचीही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. लवकरच दहा रुपयांच्या नोटांची नवीन सिरीज बाजारात येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

Web Title: How to care Holi time 2000 rs