करबचत करताना योग्य ईएलएसएस फंडाची निवड कशी करावी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

करबचतीसाठी अनेकजण ईएलएसएस (इक्विटी लिंक्ड सेविंग्स स्किम) फंडाला पसंती देतात. करबचतीबरोबरच गुंतवणूकीचा लाभ मिळवण्याचा त्यांचा उद्देश असतो. मात्र ईएलएसएस फंडांची निवड करताना काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

करबचतीसाठी अनेकजण ईएलएसएस (इक्विटी लिंक्ड सेविंग्स स्किम) फंडाला पसंती देतात. करबचतीबरोबरच गुंतवणूकीचा लाभ मिळवण्याचा त्यांचा उद्देश असतो. मात्र ईएलएसएस फंडांची निवड करताना काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ईएलएसएस फंडांना तीन वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी असतो. त्यामुळेच या ईएलएसएस फंडांची निवड करताना विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशावेळी ज्या फंडांमध्ये गुंतवलेल्या भांडलाचा आकार मोठा म्हणजेच त्यात झालेल्या गुंतवणुकीचे  प्रमाण चांगले आहे, अशाच फंडांचाच विचार केला गेला पाहिजे. 

फंड हाऊस निवडताना:
तज्ञांच्या मते, फंड हाऊस निवडताना नावाजलेले फंड हाऊसच निवडावेत. काही ईएलएसएस फंडाची खराब कामगिरी हेसुद्धा फंड निवडीवर प्रभाव टाकणारा मुख्य घटक आहे. या गटातील फंडांनी तीन वर्षांच्या गुंतवणूकीवर साधारणपणे 10.51 टक्क्यांचा परतावा दिला आहे. मात्र काही ईएलएसएस फंडांची कामगिरी मात्र फारच सुमार आहे. डेट फंडांपेक्षा कमी परतावा देत या फंडांनी फक्त 3.18 टक्क्यांचा  वार्षिक परतावा दिला आहे. 

योग्य प्रकारात गुंतवणूक: 
त्याचबरोबर गुंतवणूकदारांनी ईएलएसएस फंडांच्या लॉक-इन कालावधीकडे लक्ष देण्याची गरज आहे. यात ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड असे दोन प्रकार असतात. क्लोज एंडेड फंडांचा लॉक-इन कालावधी दहा वर्षे तर ओपन एंडेड फंडांचा कालावधी तीन वर्षांचा असतो. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी ओपन एंडेड फंडांची निवड करण्याचा सल्ला तज्ञ देतात.

महत्वाच्या इतर बाबी:
 कोणत्याही ईएलएसएस फंडामध्ये गुंतवणूक करताना त्यांच्या मागील पाच वर्षांच्या जोखीमआधारित  परताव्याची माहिती घेतली पाहिजे. 

याबरोबरच फंडांच्या मागील पाच वर्षांच्या कामगिरीतील सातत्यसुद्धा बघितले पाहीजे. त्या फंडाने किती वेळा बेंचमार्कच्या वर जाऊन परतावा दिला हेसुद्धा तितकेच महत्वाचे आहे. फंडांच्या निवडीतील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, 'ग्रोथ ऑप्शन'ची निवड. ईएलएसएस फंड डिव्हीडंडसुद्धा (लाभांश) पर्याय देतात. यात फंडाला झालेल्या लाभातून डिव्हीडंड दिला जातो. मात्र दिर्घकालीन चांगल्या परताव्याचा विचार केल्यास 'ग्रोथ' पर्यायातूनच चांगला परतावा मिळतो.

Web Title: How to choose ELSS for long term investment