तुमची ‘सही’ कशी असावी?

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

प्रश्‍न: बॅंकिंग व्यवहारात इंग्रजीमधूनच स्वाक्षरी करण्याचे बंधन असते काय? हा माझा मूळ प्रश्‍न आहे. कर्जमंजुरीनंतर बॅंकेच्या कागदपत्रांवरील माझी स्वाक्षरी मराठीत असल्याने मला इंग्रजी समजते, अशा प्रकारचे "डिक्‍लरेशन' देण्यास मला सांगण्यात आले. एका भारतीय बॅंकेने मराठीतील (देवनागरी) सही नाकारावी आणि जे इंग्रजीत सही करतात, त्यांनाच उच्चशिक्षित समजावे, ही बाबच मला धक्कादायक वाटली.

प्रश्‍न: बॅंकिंग व्यवहारात इंग्रजीमधूनच स्वाक्षरी करण्याचे बंधन असते काय? हा माझा मूळ प्रश्‍न आहे. कर्जमंजुरीनंतर बॅंकेच्या कागदपत्रांवरील माझी स्वाक्षरी मराठीत असल्याने मला इंग्रजी समजते, अशा प्रकारचे "डिक्‍लरेशन' देण्यास मला सांगण्यात आले. एका भारतीय बॅंकेने मराठीतील (देवनागरी) सही नाकारावी आणि जे इंग्रजीत सही करतात, त्यांनाच उच्चशिक्षित समजावे, ही बाबच मला धक्कादायक वाटली. उद्या हीच बॅंक मराठीतून स्वाक्षरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींकडूनही असे "अंडरटेकिंग' घेणार का, असा प्रश्‍न मी संबंधित अधिकाऱ्यास विचारला असता, त्याने उत्तर देण्याचे टाळले. मी मराठीची प्राध्यापक असून, माझ्या क्षेत्रात मी डॉक्‍टरेट मिळविली आहे. माझी मराठीतील सही मला महाराष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक वाटते. याबाबतीत आपले कायदेशीर मत मांडावे, ही विनंती.

उत्तर: आपण नमूद केल्याप्रमाणे बॅंकिंग व्यवहारात आपली स्वाक्षरी कोणत्या लिपीत असावी याला कायद्याने कोणतेही बंधन नाही. "नमुना स्वाक्षरी' याचा अर्थ आपण बॅंकेमध्ये एकदा केलेली स्वाक्षरी पुढे सर्व व्यवहारातही तशीच असावी व ती आपणास बदलावयाची असल्यास केवळ बॅंकेच्या संमतीने आपल्या "नमुना स्वाक्षरी'मध्ये बदल करून ती बदलता येते. आपण उच्चशिक्षित आहात व आपणास इंग्रजी समजते हे माहीत असतानाही केवळ आपण मराठीमध्ये स्वाक्षरी करता म्हणून आपणाकडून इंग्रजी समजत असल्याबद्दलचे "अंडरटेकिंग' घेण्याचा बॅंकेचा निर्णय हास्यास्पद आहे. बॅंकांनी घालून दिलेले नियम कोणतीही जबाबदारी न घेता डोळे झाकून अमलात आणण्याची तेथील बॅंक कर्मचाऱ्याची वृत्ती यामधून दिसून येते. वास्तविक बॅंकेने केलेला हा नियम त्यांना पूर्वी आलेल्या अनुभवांवर आधारित असावा. बॅंकेचे करार व कर्जाची इतर कागदपत्रे इंग्रजीत असल्याने बऱ्याच वेळेस कोर्टामध्ये कर्जदार, "मला इंग्रजी येत नसल्याने या करारामध्ये काय लिहून घेतले आहे, याची मला कल्पना नाही,' अशी भूमिका घेतात. यातून मार्ग काढण्यासाठी पूर्वी इंग्रजीमधील करारनाम्यावरच खाली मराठीतून "शाखाधिकाऱ्याने वरील करारामध्ये लिहिलेला मजकूर मला मराठीतून वाचून दाखविला व तो मला मान्य आहे,' अशा प्रकारची टीप लिहून कर्जदार, जामीनदारांची स्वाक्षरी घेतली जात होती. परंतु आपली शैक्षणिक पात्रता व व्यवसाय पूर्ण माहीत असून व आपणास इंग्रजी भाषेचे पूर्ण ज्ञान आहे, हे माहीत असूनही केवळ आपली स्वाक्षरी मराठीत आहे म्हणून आपणाकडून वरील स्वरूपाचे "अंडरटेकिंग' मागणे हा ग्राहकांचा अपमानच आहे. याउलट बऱ्याच वेळेस इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करणाऱ्यांना इंग्रजी अजिबात येत नाही. त्यांना केवळ इंग्रजीमधून सही करता येत असते. अशावेळी वरील नियमानुसार त्यांच्याकडून "अंडरटेकिंग' घेतले जाणार नाही व बॅंकेचा उद्देश सफल होणार नाही. वास्तविक बॅंकेने हा नियम कशासाठी केला आहे, हे जाणून घेऊन आवश्‍यकतेनुसार त्याचा वापर करण्याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित बॅंक कर्मचाऱ्याची असते. बॅंकेत कर्जासाठी अर्ज करताना बऱ्याच वेळेस अर्जदाराचे रेशनकार्ड मागितले जाते. त्यामागे अर्जदार हा बॅंकेच्या क्षेत्रात वास्तव्यास आहे का, हे पाहण्याचा उद्देश असतो. मात्र, बऱ्याच वेळेस अर्जदाराकडे स्वतःचे रेशनकार्ड नसते. परंतु बॅंकेचा उद्देश माहीत असल्यास अर्जदाराचे टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्‍स आदी कागदपत्रांद्वारे अर्जदार बॅंकेच्या कार्यक्षेत्रातील आहे का नाही, ते तपासता येते. परंतु कोणत्या उद्देशाने बॅंकेने रेशनकार्ड दाखल करण्याची अट घातली आहे, हे माहीत नसल्याने कित्येकदा अर्जदारास नवीन रेशन कार्डही काढण्यास सांगितले जाते. आपलाही प्रकार याच धर्तीतील आहे. तरीही बॅंक अधिकाऱ्याची ही मागणी अयोग्यच आहे. त्यातही इंग्रजी येत असल्याबद्दल "अंडरटेकिंग' इंग्रजीमध्येच असेल तर तो विनोद होईल.

Web Title: How should your 'signechers' be?