सोन्याला वाढली मागणी 

पीटीआय
Tuesday, 15 October 2019

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने सोन्याच्या भावात सोमवारी वाढ नोंदविण्यात आली. याचबरोबर सणासुदीमुळे मागणी वाढल्यामुळेही सोन्याची झळाळी वाढली आहे. 

नवी दिल्ली  - डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने सोन्याच्या भावात सोमवारी वाढ नोंदविण्यात आली. याचबरोबर सणासुदीमुळे मागणी वाढल्यामुळेही सोन्याची झळाळी वाढली आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर आज सोने आणि चांदीचा भाव वधारला. सोन्याचा भाव प्रतिऔंस 1 हजार 490 डॉलर आणि चांदीचा भाव प्रतिऔंस 17.57 डॉलरवर गेला. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचा भाव वधारल्याने स्थानिक बाजारपेठेत भावात तेजी निर्माण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाल्याचाही फायदा आज सोन्याला झाला. सणासुदीमुळे सोन्याला मागणी वाढली आहे, याचाही सकारात्मक परिणाम होत आहे, अशी माहिती एचडीएफसी सिक्‍युरिटीजचे वरिष्ठ विश्‍लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांनी दिली. दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 145 रुपयांनी वधारून 38 हजार 885 रुपयांवर गेला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 240 रुपयांची वाढ होऊन 46 हजार 510 रुपयांवर पोचला. 

मुंबईतही भाव वधारले 
मुंबईतील सराफा बाजारातही आज सोने आणि चांदीच्या भावात वाढ नोंदविण्यात आली. मुंबईत शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 194 रुपयांनी वाढून 38 हजार 487 रुपयांवर गेला. स्टॅंडर्ड सोन्याचा भावही 193 रुपयांनी वधारून 38 हजार 133 रुपयांवर पोचला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 105 रुपयांची वाढ होऊन 45 हजार 375 रुपयांवर गेला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased gold demand