देशाच्या जीडीपीत ऐतिहासिक घट; इतर प्रमुख राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती काय?

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 2 September 2020

 कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या अर्थव्यवस्थेत होणारी ही घसरण चिंताजनक असल्याचे अनेक अर्थतज्ञांकडून बोलले जात आहे.

भारताच्या सांख्यिकी विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून भारताचा जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उपन्न  -23.9 टक्क्यांवर आले असून गेल्या 6 वर्षांतील ही  सर्वात मोठी घसरण असल्याचे दिसून येते. 1929-30 च्या जागतिक महामंदीनंतर ही  सर्वात मोठी आणि गंभीर आर्थिक समस्या असल्याचे आजच्या परिस्थितीचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून वर्णन करण्यात आलं आहे.  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या अर्थव्यवस्थेत होणारी ही घसरण चिंताजनक असल्याचे अनेक अर्थतज्ञांकडून बोलले जात आहे. परंतु,  निव्वळ करोना रोगाला अटकाव घालण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे ही  परिस्थिती उद्भवली नसून त्याआधीच अर्थव्यवस्थेची अवस्था दर्शवणारे आकडे हे उतरतीला  लागले होते, असं दिसून येतं. 

निगेटिव्ह जीडीपी रेट'चा सांगावा​

जीडीपी म्हणजे काय?

जीडीपी (Gross Domestic Product) अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्न ही बाब कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाची घोडदौड दाखवणारा निर्देशांक असतो. सोप्या शब्दात जीडीपी म्हणजे ठराविक काळात देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादनांची किंमत होय. कमी उत्पन्न असणार्‍या किंवा मध्यम उत्पन्न असणार्‍या देशांसाठी, वाढत्या लोकसंख्येची वाढती गरज भागविण्यासाठी प्रतिवर्षी जीडीपीमध्ये वाढ आवश्यक आहे. म्हणूनच, भारतासारख्या देशासाठी जीडीपीमध्ये होत असणारी घेत अथवा वृद्धी ही महत्वाची आणि दखलपात्र बाब ठरते. देशाच्या आर्थिक तब्येतीचं मोजमाप जसे जीडीपीच्या आकड्यावरून केलं जातं  त्याचप्रमाणे विविध ध्येयधोरणे ठरवण्यासाठी आणि आर्थिक गुंतवणूकीसंदर्भातील बऱ्याच बाबी या जीडीपीवरूनच ठरवल्या जातात. जीडीपी ठरवण्याची पद्धत ही प्रत्येक देशाची वेगवेगळी असू शकते.

भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला दणका, पण चीन कसं सुस्थितीत?

जाणून घेऊया जगभरातील मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशातील परिस्थिती 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगालाच हादरवून सोडले आहे. चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना इटली, जर्मनी, अमेरिका अशा अनेक देशांमध्ये हाहाकार माजवणारा ठरला आहे. लॉकडाऊनमुळे सगळ्याच प्रमुख देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वृद्धीत घट झाल्याचं दिसून येत आहे. जागितिकीकरणानंतर सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असल्याकारणाने अमेरिका, युरोप, जपान आणि चीन या देशांमधील आर्थिक हालचाली मंदावल्या तर त्याचा थेट परिणाम भारतावर देखील होतो.  

प्रमुख देश आणि जीडीपी दर 

युनायटेड किंगडम :  - 20.4
फ्रांस : -13.8
इटली : -12.4
कॅनडा : -12
जर्मनी : -10.1
अमेरिका : - 9.5
जपान : -9.7

वरील आकडेवारी पाहता जीडीपीच्या दरात भारताची झालेली घट  ही  -23.9  असून ती सर्वाधिक आहे. मात्र, सध्या असलेल्या लॉकडाउनमुळे निश्चित अशी आकडेवारी मिळविणे सरकारलाही अवघड जात आहे. मे महिन्याच्या अखेरीस राष्ट्रीय उत्पन्नाबद्दलची आकडेवारी उपलब्ध झाल्यावर यासंदर्भात काहीशी स्पष्टता येऊ शकेल. त्यानंतरच 'जीडीपी'च्या दराबद्दल अंदाज वर्तवता येऊ शकेल, असे भारताचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India GDP Rate And World Wide largest economies After Corona