भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला दणका, पण चीन कसं सुस्थितीत?

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 2 September 2020

कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-जून महिन्याच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी GDP) २३. ९ टक्क्यांची अभूतपूर्व घट झाली आहे

नवी दिल्ली- कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-जून महिन्याच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी GDP) २३. ९ टक्क्यांची अभूतपूर्व घट झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे जीडीपीमध्ये घट होईल अशी शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, सोमवारी जी आकडेवारी समोर आली ती अंदाजापेक्षा खूप अधिक होती. देशात १९९६ पासून जीडीपी जाहीर केली जाते. तेव्हापासून आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण आहे. आधीच भारताची अर्थव्यवस्था संकटात होती, त्यात कोरोना महामारीमध्ये लादण्यात आलेला लॉकडाऊन विनाशकारी सिद्ध होत आहे.   

केंद्र सरकारचे फेसबुकला पत्र; PM मोदींबद्दल कर्मचाऱ्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप

कोरोना महामारीला रोखण्यासाठी लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. लोकांचा कल पैसे खर्च न करता साठवून ठेवण्याकडे वळला आहे. भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची करण्याचे आहे. मात्र, भारताच्या सांख्यिकी विभागाने पहिल्या तिमाहीतील जाहीर केलेली आकडेवारी निराश करणारी आहे. एप्रिल-जूनच्या तिमाहीत भारताच्या जीडीपीत उणे २३.९ टक्के वाढ झाल्याची नोंद झाले आहे. आता भारताला पुन्हा जीडीपी २४ टक्क्यांनी वाढवण्यात आणि त्यानंतर शून्यापासून पुढे जाण्यात खूप वेळ लागणार आहे.

कठोर लॉकडाऊनचा परिणाम

फाइनेंशियल टाईम्ससोबत चर्चा करताना ऑक्सफोर्ड इकोनॉमिस्कमध्ये भारताच्या साऊथ इस्ट एशिया इकोनॉमिक्सचे प्रमुख प्रियंका किशोर यांनी यावर भाष्य केलं आहे. भारताच्या जीडीपीमध्ये अंदाजापेक्षा खूप घसरण झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडानचा हा परिणाम आहे. एका रात्रीत लॉकडाऊन लागू केल्याने सर्व उद्योगधंदे एका झटक्यात बंद पडले. दुसरीकडे १४ करोड लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. भारताचा लॉकडाऊन सर्वाधिक कठोर होता. त्याची किंमत भारताला चुकवावी लागणार होतीच, असं ते म्हणाले आहेत. 

नियमित रेल्वे कधी सुरु होणार? IRCTC ने दिलं उत्तर

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मॅन्युफॅक्चरिंग, निर्माण, व्यापार, हॉटेल, ट्रान्सपोर्ट, संचार इत्यादि क्षेत्राचा देशाचा जीडीपीमध्ये जवळजवळ ४५ टक्क्यांचे योगदान आहे. पहिल्या तिमाहीमध्ये या सर्व क्षेत्रांच्या व्यवसायावर वाईट परिणाम पडला आहे. मानांकन संस्था ICRA ने जीडीपीमध्ये २५ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज लावला होता. आशियातील अन्य देशांशी तुलना करता भारताची अर्थव्यवस्था सर्वात वाईट स्थितीत असल्याचं दिसत आहे.

चीनची जीडीपी प्लसमध्ये

भारताचा शेजारी देश चीनमधून कोरोना महामारीची सुरुवात झाली होती. मात्र, चीन आता या महामारीसोबत आर्थिक संकटातूनही बाहेर येताना दिसत आहे. कारण चीनच असा मोठा देश आहे, ज्याची जीडीपीची वाढ प्लसमध्ये आहे. अमेरिका, जपानसह अनेक देशांची जीडीपी वाढ नकारात्मक आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातील चीनच्या जीडीपीमध्ये ६.८ टक्क्यांची घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. १९९२ पासून पहिल्यांदाच चीनच्या जीडीपीमध्ये घट झाली होती. मात्र, आता चीनच्या जीडीपीमध्ये ३.२ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने सुधारणा दिसून येत आहे. जून महिन्यात चीनच्या मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्राला गती आली आहे. देशातील आयात-निर्यात वाढली आहे. अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार चीनने दुसऱ्या देशांच्या तुलनेत लॉकडाऊनच्या नियमांमधून लवकर सुट देण्यास सुरुवात केली होती. चीनने फक्त वुहान शहरातच कठोर लॉकडाऊन लागू केला होता. देशाच्या इतर भागात चीनने अधिकतर आर्थिक गतीविधी सुरु ठेवल्या होत्या. जेव्हा सर्व जग लॉकडाऊनकडे जात होतं, तेव्हा चीनला जागतिक निर्यातीसाठी जास्त संधी मिळाली.

जगातील काही अर्थव्यवस्थांवर कोरोना महामारीचा पडलेला परिणाम आपण पाहूया...

अमेरिका

कोरोना महामारीने सर्वाधिक प्रभावीत अमेरिका देश ठरला आहे. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही झाला. अमेरिकेच्या जीडीपीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल-जून) ९.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. अमेरिकेत १९४७ पासून जीडीपीमध्ये कोणत्याही तिमाहीतील ही सर्वाधिक घट आहे.

यूके

२०२० मधील दुसऱ्या तिमाहीत ब्रिटनच्या जीडीपीत २१.७ टक्यांची घट झाली आहे. ब्रिटनमध्ये सलग दुसऱ्या तिमाहीमध्ये ही घट दिसून आली आहे. 

इटली 

इटलीच्या जीडीपीमध्ये एप्रिल-जूनच्या तिमाहीमध्ये १७.७ टक्क्यांची घट नोंद झाली. १९९५ च्या पहिली तिमाहीनंतर झालेली ही सर्वाधिक घसरण आहे.

फ्रान्स

फ्रान्सच्या जीडीपीत एप्रिल-जूनच्या तिमाहीत विक्रमी १८.७ टक्क्यांची घसरण नोंद झाली.

जर्मनी

यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये मागील वर्षीच्या याच काळातील तिमाहीपेक्षा जीडीपीमध्ये ११.३ टक्क्यांची घट झाली आहे. जर्मनीने तिमाहीची आकडेवारी जेव्हापासून जाहीर करणे सुरु केले आहे, तेव्हापासूनची ही सर्वाधिक घट आहे.

जपान

२०२० च्या एप्रिल-जूनच्या तिमाहीत जपानच्या अर्थव्यवस्थेत विक्रमी ९.९ टक्क्यांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: compare to asian countries india gdp growth worst chin gdp