शेअर बाजारात गुंतवणुकीची संधी (व्हिडिओ)

शेअर बाजारात गुंतवणुकीची संधी (व्हिडिओ)

"इंडिया मार्ट'ची बहुचर्चित प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 24 ते 26 जून दरम्यान होणार आहे. या इश्‍यूसाठी प्रतिशेअर किंमतपट्टा रु. 970-973 ठरविण्यात आला आहे. किमान 15 व त्यापुढे 15 शेअरच्या पटीत मागणी करता येणार आहे. गुंतवणूकदारांसाठी हा "आयपीओ' कसा आहे, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न. 

प्रश्‍न ः इंडिया मार्टच्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे? 
- ता. 24 ते 26 जून दरम्यान हा पब्लिक इश्‍यू प्राथमिक बाजारात विक्रीसाठी खुला होत आहे. 476 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी प्रतिशेअर किंमतपट्टा रु. 970-973 ठरविण्यात आला आहे. किमान 15 व त्यापुढे 15 शेअरच्या पटीत मागणी करता येणार आहे. चार जुलैच्या आसपास या शेअरची बाजारात नोंदणी होईल. 

प्रश्‍न ः कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप कसे आहे? 
- इंडिया मार्ट ही कंपनी खरेदीदार आणि विक्रेता यांच्यामधील ऑनलाइन दुवा म्हणून काम करते. म्हणजेच विक्रेत्याला खरेदीदार आणि खरेदीदाराला विक्रेता मिळवून देण्यासाठी मदत करते. त्यांच्या कामाचे स्वरूप प्रामुख्याने "बी टू बी' (बिझनेस टू बिझनेस) या पद्धतीचे आहे. इच्छुक विक्रेता असतो, त्याला खरेदीदाराकडून झालेल्या चौकशीची सूचना या ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे लगेच समजते व त्यानुसार तो ग्राहकाशी संपर्क करू शकतो; पण यासाठी जे इच्छुक विक्रेते असतील, त्यांना इंडिया मार्टला एक ठराविक फी द्यावी लागते आणि हाच कंपनीचा महत्त्वाचा उत्पन्नस्रोत आहे. 2016 ते 2019 पर्यंत अशी फी देणाऱ्या सभासदांची संख्या 72 हजारांपासून 1 लाख 30 हजारांपर्यंत वाढली आहे. 

"इंडिया मार्ट'ची बहुचर्चित आयपीओबद्दल माहिती सांगत आहेत नंदिनी वैद्य 
प्रश्‍न ः इंडिया मार्टची आर्थिक कामगिरी कशी आहे? 
- मागील तीन वर्षांमध्ये कंपनीचे उत्पन्न 331.94 कोटींपासून 548.39 कोटींपर्यंत वाढले आहे, तर निव्वळ नफा (64.5 कोटी तोटा) वरून 20.4 कोटींपर्यंत वाढला आहे. मागील तीन वर्षांमध्ये उत्पन्न चांगल्या पद्धतीने वाढले असले तरी निव्वळ नफा त्याप्रमाणात वाढलेला नाही. कंपनी कर्जमुक्त आहे. आर्थिक वर्ष 2019 साठीचा प्रतिशेअर नफा रु. 30 असून, रिटर्न ऑन इक्विटी 13 टक्के आहे. 

प्रश्‍न ः कंपनीच्या व्यवसायाच्या मजबूत बाबी कोणत्या आहेत? 
- या व्यवसायामध्ये असणाऱ्या मोठ्या कंपन्यांमधील एक महत्त्वाची कंपनी म्हणून इंडिया मार्टचे नाव घेता येईल. अगदी सुरवातीला म्हणजे 1999 मध्ये या व्यवसायात उडी मारल्यामुळे कंपनीची घडी नीट बसली आहे. एसएमई सेक्‍टरमध्ये आगामी काळात जी वाढ होऊ घातली आहे, त्याचा फायदा थेट या कंपनीला होणार आहे. भारतभर पसरलेले वितरणाचे मजबूत जाळे, तांत्रिकदृष्ट्या स्थिर, साधारण 50 पेक्षा अधिक उद्योग व त्यांची 97 हजारांपेक्षा अधिक उत्पादने कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर आजघडीला उपलब्ध आहेत. 

प्रश्‍न ः आगामी काळात या व्यवसायाशी निगडित असणाऱ्या कोणत्या जोखमीचा कंपनीला सामना करावा लागू शकेल? 
- कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणाऱ्या उत्पादनाच्या मागणीवर जर विपरीत परिणाम झाला तर त्याचे मोठे परिणाम कंपनीच्या उत्पन्नावर होईल. तसेच आता खूप मोठ्या कंपन्यांचा (अलिबाबा इंडिया, ट्रेड इंडिया, गुगल) या क्षेत्रात प्रवेश झाला असल्यामुळे आगामी काळात इंडिया मार्टला फार मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. 

प्रश्‍न ः किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हा "आयपीओ' कसा आहे? 
- आज शेअर बाजारामध्ये कंपनीच्या व्यवसायाशी तुलना होईल, अशी कोणतीही नोंदणीकृत कंपनी नाही. रु. 30 प्रतिशेअर नफा गृहीत धरता पीई रेशो 33 च्या घरात येतो. 1999 पासून कंपनी या व्यवसायात असूनदेखील तितकासा फायदा त्यांनी करून घेतलेला आहे, असे दिसत नाही. तसेच आगामी काळात त्यांना प्रचंड स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. सध्या सेकंडरी बाजारदेखील कमी होत असलेल्या "जीडीपी', येऊ घातलेला केंद्रीय अर्थसंकल्प, तसेच तिमाही निकाल, येस बॅंक, आयएलएफएस, दिवाण हाउसिंग यांनी निर्माण केलेल्या वादळांमुळे अस्थिर आणि सावध आहे. अशा वेळी किरकोळ गुंतवणूकदारांनी इंडिया मार्टच्या "आयपीओ'साठी नोंदणी केली नाही तरी चालू शकेल अथवा 24 आणि 25 तारखेला या "आयपीओ'ला खूप प्रतिसाद मिळत असल्याचे दिसल्यास 26 तारखेला दीर्घ कालावधीसाठी म्हणून मागणीअर्ज करण्यास हरकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com