इंडियन ऑईल कॉर्पोरेशन करणार 23,000 कोटींची गुंतवणूक 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

भारताची सर्वात मोठी खनिज तेल शुद्धीकरण कंपनी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 23,000 कोटींच्या गुंतवणूकीचा आराखडा तयार केला आहे. येत्या 1 एप्रिल 2018 पासून त्याच्या अंमलबजावणीला सुरूवात होईल.

दिल्ली : भारताची सर्वात मोठी खनिज तेल शुद्धीकरण कंपनी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 23,000 कोटींच्या गुंतवणूकीचा आराखडा तयार केला आहे. येत्या 1 एप्रिल 2018 पासून त्याच्या अंमलबजावणीला सुरूवात होईल.

क्षमता विस्तार
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी गुंतवणुकीच्या खर्चात वाढ करण्यात आली आहे. कंपनी ही गुंतवणूक मुख्यत: कंपनीच्या क्षमतेचा विस्तार आणि आधुनिकीकरणावर करण्यात येणार आहे. त्याखेरीज विपणन यंत्रणेला अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट कंपनीसमोर आहे. गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या भांडवलाची उभारणी कर्जातून किंवा रोख्यांच्या माध्यमातून करण्याचा कंपनीचा विचार नाही. कंपनीच्या उत्पन्नातूनच ही गुंतवणूक करण्याचा इंडियन ऑईल कॉर्पोरेशनची योजना आहे. आर्थिकदृष्ट्या कंपनी सुस्थितीत असून कंपनीच्या पूर्व विभागाच्या कामगिरीत सुधारणा झाल्यामुळे यावर्षी त्या विभागाकडून चांगल्या नफ्याची अपेक्षा असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. 

वाढती स्पर्धा
भारत सध्या जगातल्या सर्वाधिक उर्जेचा वापर करणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. भारताची खनिज तेलाची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 
त्यामुळेच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसारख्या खनिज तेल शुद्धीकरण कंपनीला स्पर्धेतील स्वत:चे  स्थान टिकवण्यासाठी आपल्या क्षमतांचा विस्तार करणे गरजेचे  आहे. भारतातल्या खनिज तेल शुद्धीकरणात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा वाटा 35 टक्के आहे. तर पेट्रोलियम उत्पादनांच्या बाबतीत इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा भारतीय बाजारपेठेतला हिस्सा 45 टक्के आहे. या कंपनीला खाजगी कंपन्याकडून मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागत आहे. 

खाजगी कंपन्यांनी गेल्या तीन वर्षात भारतीय बाजारपेठेतला खप तिपटीने वाढवला आहे. त्यामुळेच आगामी काळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

 

Web Title: Indian Oil Corporation to mull investing 3.5 billion dollar