
भांडवली बाजारमूल्याबाबत HDFC समूह दुसऱ्या क्रमांकावर
मुंबई : शेअरबाजारात (Indian share market) नोंदविलेल्या कंपन्यांच्या भांडवली बाजारमूल्याच्या (capital market value) बाबतीत एचडीएफसी (HDFC) समूहाने मोठी झेप घेतली आहे. त्यांनी रिलायन्स समूहाला (reliance group) मागे टाकले असून टाटा समूहामागोमाग (tata group) दुसरा क्रमांक (second rank) मिळवला आहे.
वैयक्तीक समभागांचा विचार केल्यास टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्या भांडवली बाजारमूल्याबाबत अग्रभागी आहेत. मात्र समूह म्हणून पाहिल्यास आता एचडीएफसी समूहाने चांगलीच भरारी मारली आहे. सध्या रिलायन्स उद्योगाचा शेअर घसरत असून दुसरीकडे बँकांच्या आणि वित्तसंस्थांच्या शेअरच्या भावात वाढ होत आहे. त्यामुळे एचडीएफसी समूहाला हा मान मिळाला आहे.
आज एचडीएफसी समूहाचे भांडवली बाजारमूल्य (मार्केट कॅपिटलायझेशन) 15.56 लाखकोटी रुपयांवर गेले तर रिलायन्स समूहाचे भांडवली बाजारमूल्य 15.24 लाखकोटी रुपयांवर आले आहे. एचडीएफसी समूहात एचडीएफसी ही गृहकर्ज देणारी कंपनी, एचडीएफसी बँक तसेच एचडीएफसी एएमसी, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स आदी कंपन्या आहेत.
समूहाच्या भांडवली बाजारमूल्याच्या बाबतीत टाटा समूह सर्वात मोठा आहे. त्यांचे एकूण मार्केट कॅप जवळपास 22 लाखकोटी रुपये आहे. या समूहात टीसीएस सारखी दादा कंपनी असून त्याखेरीज टायटन, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा टेलिसर्व्हिस महाराष्ट्र, टाटा कंझ्युमर्स, टाटा कॉफी, टाटा फ्लेक्सी, टाटा केमिकल्स अशा सुमारे 29 कंपन्या शेअरबाजारात नोंदणीकृत आहेत.