परकीय गंगाजळी पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जानेवारी 2018

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत परदेशी चलनांचे मूल्य वाढल्याने भारताच्या परकीय गंगाजळीत वाढ झाली आहे.

मुंबई: देशातील परकीय गंगाजळी पुन्हा एकदा उच्चांकी पातळीवर पोचली आहे. 5 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील परकीय गंगाजळीचे प्रमाण 1.758 अब्ज डॉलर्सनी वाढून 411.124 अब्ज डॉलरएवढे झाले आहे. त्याअगोदरच्या आठवड्यात, परकीय चलनसाठा 4.444 अब्ज डॉलरच्या वाढीसह 409.366 अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर पोचला होता.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत परदेशी चलनांचे मूल्य वाढल्याने भारताच्या परकीय गंगाजळीत वाढ झाली आहे. चालू आठवड्यात परदेशी चलनातील मालमत्ता 2.045 अब्ज डॉलरने वाढून 387.194 अब्ज डॉलरवर पोचली आहे.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रिझर्व्ह बॅंकेकडील युरो, पाउंड आणि येन यांसारख्या चलनांच्या मूल्यात वाढ-घट होत असल्याने परकीय गंगाजळीच्या एकूण मूल्यात बदल होत असतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या 'स्पेशल ड्रॉयिंग राइट्स'मधील भारताचा हिस्सा वाढला असून तो 32 लाख अमेरिकी डॉलरने वाढून 1.514 अब्ज डॉलरवर पोचला आहे. 

 

Web Title: India's Forex Reserves Zoom To Record High Of $411.124 Billion