जगाच्या तुलनेत भारताची संपत्ती घटली

वृत्तसंस्था
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

मुंबई: भारतातील एकूण संपत्ती 0.8 टक्‍क्‍यांनी म्हणजे 26 अब्ज डॉलरने कमी होऊन तीन लाख कोटी डॉलरएवढी झाली आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा देणारी कंपनी क्रेडिट स्यूसच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. भारताचा एकूण जागतिक संपत्तीत 1.2 टक्के वाटा आहे.

मुंबई: भारतातील एकूण संपत्ती 0.8 टक्‍क्‍यांनी म्हणजे 26 अब्ज डॉलरने कमी होऊन तीन लाख कोटी डॉलरएवढी झाली आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा देणारी कंपनी क्रेडिट स्यूसच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. भारताचा एकूण जागतिक संपत्तीत 1.2 टक्के वाटा आहे.

क्रेडिट स्यूस संशोधन संस्थेने संपादित केलेल्या 'जागतिक संपत्ती अहवालात' 2000 ते 2016 दरम्यान जगातील विविध देशांमधील संपत्ती आकडेवारी मांडण्यात आली आहे. त्यानुसार, भारतातील संपत्ती (डॉलरमध्ये) 2016 मध्ये 0.8 टक्‍क्‍याने घसरून 3.099 लाख कोटी डॉलरएवढी झाली आहे. चलनाचे अवमूल्यन हे त्यामागील प्रमुख कारण आहे.
भारतीयांच्या संपत्तीचे सरासरी प्रमाण 3835 डॉलर आहे. मागील 16 वर्षांमध्ये देशातील संपत्तीत वाढ झाली तरी यात प्रत्येकाचा वाटा सारखा नाही हे नमूद करीत देशातील आर्थिक विषमता अधोरेखित करण्यात आली आहे. अजूनही 96 टक्के प्रौढांकडे असलेल्या संपत्तीचे प्रमाण 10 हजार डॉलरपेक्षा कमी आहे. याउलट, केवळ 0.3 टक्के म्हणजे केवळ 24 लाख लोकांकडे 1 लाख डॉलरपेक्षा अधिक संपत्ती आहे.

प्रत्येक नागरिकावरील सरासरी कर्जाचे प्रमाण 376 डॉलरएवढे आहे. अनेक गरीब भारतीयांसाठी कर्जाची समस्या मोठी असली तरी इतर विकसनशील देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमीच असल्याचे अहवालात म्हटले आहे.
जगभरातील एक टक्का सर्वाधिक श्रीमंतांमध्ये 2,48,00 भारतीयांचा समावेश आहे. एकूण 2260 प्रौढांकडे 5 कोटी डॉलरपेक्षा जास्त संपत्ती असून 1040 प्रौढांकडे 10 कोटी डॉलरहून अधिक संपत्ती आहे. भारतातील बहुतांश संपत्ती ही प्रॉपर्टी किंवा चल स्वरुपात असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आशियाई-पॅसिफिक प्रदेशातील संपत्ती 4.5 टक्के वाढीसह 80 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. त्यापैकी भारत व चीनमधील संपत्ती अनुक्रमे 2.8 टक्के आणि 0.8 टक्‍क्‍यांनी घसरुन 23 लाख कोटी डॉलर व 3 लाख कोटी डॉलरएवढी झाली आहे. दोन्ही देशांमधील संपत्तीच्या घसरणीला चलनातील अस्थिरता कारणीभूत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Web Title: india's wealth declines by 26 billion dollars