esakal | चलनवाढीचा पारा चढला
sakal

बोलून बातमी शोधा

चलनवाढीचा पारा चढला

भाजीपाला आणि इतर खाद्यान्न वस्तूंच्या किमती वाढल्याने नोव्हेंबर महिन्यात किरकोळ बाजारातील चलनवाढीचा दर ५.५४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे.

चलनवाढीचा पारा चढला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भाजीपाला आणि इतर खाद्यान्न वस्तूंच्या किमती वाढल्याने नोव्हेंबर महिन्यात किरकोळ बाजारातील चलनवाढीचा दर ५.५४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. किरकोळ चलनवाढीच्या दराने गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी स्तर गाठला आहे. चलनवाढ निर्देशांकाने चार टक्‍क्‍यांची पातळी ओलांडल्याने रिझर्व्ह बॅंकेवरील दबाव वाढला आहे. रिझर्व्ह बॅंकेने मध्यम कालावधीत चार टक्‍क्‍यांपर्यंत चलनवाढ नियंत्रणाचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. ऑक्‍टोबर महिन्यात किरकोळ महागाई दर ४.६२ टक्‍क्‍यांवर होता. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले.

शेअर बाजारातील गुंतवणुकदारांनी 'इथून' मिळविला मोठा नफा

सांख्यिकी विभागाने गुरुवारी (ता. १२) चलनवाढीची आकडेवारी जाहीर केली आहे. अन्नधान्याच्या किमतीत नोव्हेंबरमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबर महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागातील अन्नधान्यातील महागाई दर १०.०१ टक्‍क्‍यांवर पोचला आहे, जो ऑक्‍टोबरमध्ये ७.८९ टक्के होता. वर्षभरापूर्वी तो २.६१ टक्के होता. ग्राहक किंमत निर्देशांकात अन्नधान्याचा वाटा ४५.९ टक्के आहे. 

अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाई दरातसुद्धा वाढ झाली आहे. कांद्याच्या कडाडलेल्या भावाचाही महागाई दरावर परिणाम झाला. विशेषतः सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या किमतीत ४५.३ टक्‍क्‍यांनी आणि ऑक्‍टोबरमध्ये १९.६ टक्‍क्‍यांनी वाढ झाली होती. महागाई निर्देशांकात अन्नधान्याच्या किमतीचा वाटा जवळपास निम्मा असतो. ऑक्‍टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये त्यात चांगलीच वाढ झाली आहे. यापेक्षा अधिक किरकोळ महागाईचा दर जुलै २०१६ मध्ये होता. त्या वेळी हा दर ६.०७ टक्के होता.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी करा या पाच गोष्टींचे नियोजन

रिझर्व्ह बॅंकेच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत दुसऱ्या सहामाहीत महागाई दर ३.५ ते ३.७ टक्‍क्‍यांवर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात डिसेंबर येईपर्यंत तो ४.१-५.७ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीनुसार नजीकच्या काळात जरी महागाई दर वाढताना दिसत असला, तरी २०२०-२१ या आर्थिक वर्षात तो उद्दिष्टाच्या खालीच असण्याची शक्‍यता आहे.
 

loading image