शेअर बाजारातून गुंतवणूकदारांनीं 'इथून' मिळविला मोठा नफा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 December 2019

- गुंतवणूकदारांचा मिळतोय मोठा प्रतिसाद.

मुंबई : एकापाठोपाठ एक याप्रमाणे बाजारात येत असलेल्या बड्या कंपन्यांच्या प्राथमिक समभागविक्रीच्या (आयपीओ) ऑफरला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून, एकूणच 'आयपीओं'च्या बाजारपेठेला सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

'उज्जीवन स्मॉल फायनान्स बँके'च्या शेअरची मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीने निश्‍चित केलेल्या 37 रुपयांच्या 'इश्‍यू प्राइस'पेक्षा 60 टक्के अधिक वाढीसह नोंदणी झाली. उज्जीवनचा शेअर दिवसअखेर 51 टक्‍क्‍यांच्या वाढीसह 55.90 रुपयांवर बंद झाला. पहिल्याच दिवशी दमदार नोंदणी करून घसघशीत परतावा देणारा उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा 2019 मधील सर्वोत्तम आयपीओ ठरला. या महिन्यात आलेल्या "उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंके'च्या "आयपीओ'ला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

दीपिका, कतरिना नाही तर 'ही' आहे आशियातली सर्वात सेक्सी महिला

2 डिसेंबर रोजी खुला झालेला हा "आयपीओ' तब्बल 166 पट "ओव्हर सब्स्क्राइब' झाला होता. कंपनीने "आयपीओ'च्या माध्यमातून 12 कोटी 39 लाख शेअरची विक्री केली आहे. मात्र, त्याबदल्यात गुंतवणूकदारांकडून 2 हजार 53 कोटी समभागांसाठी मागणी करण्यात आली होती. कंपनीने "आयपीओ'साठी प्रतिसमभाग 36 ते 37 रुपयांचा किंमतपट्टा निश्‍चित केला होता. 

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा!

नुकत्याच आलेल्या केरळस्थित "सीएसबी' बॅंकेच्या 'आयपीओ'लाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. 'सीएसबी' बॅंकेच्या समभागाची राष्ट्रीय शेअर बाजारात 275 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्‍चित केलेल्या 195 रुपयांच्या "इश्‍यू प्राइस'पेक्षा 41 टक्के अधिक वाढीसह सभागाची नोंदणी झाली. त्याआधी रेल्वे तिकिटांचे ई-आरक्षण, तसेच रेल्वे प्रवाशांना खानपान व पेयजलाच्या पुरवठ्याचे एकाधिकार असलेल्या "इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड'च्या (आयआरसीटीसी) आयपीओलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.

गुंतवणूकदारांकडून कंपनीच्या समभागांसाठी 111 पटीने अधिक अर्ज भरण्यात आले होते. "आयपीओ'च्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात प्रतिसमभाग 320 रुपयांप्रमाणे विक्री करण्यात आली होती. आता तो 867 रुपयांवर व्यवहार करीत आहे. या समभागाने दोन महिन्यांच्या कालावधीत 981 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. 

या 'आयपीओं'ची प्रतीक्षा 

एसबीआय कार्डस अँड पेमेंट सर्व्हिसेसने "आयपीओ'साठी अर्ज केला आहे. या "आयपीओ'द्वारे "एसबीआय कार्डस' 8 हजार ते 9 हजार 500 कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी करण्याची शक्‍यता आहे.

याचबरोबर देशातील सर्वांत जुनी म्युच्युअल फंड कंपनी असलेली यूटीआय ऍसेट मॅनेजमेंट कंपनी "ऑफर फॉर सेल'च्या (ओएफएस) माध्यमातून 8.25 टक्के हिस्सा विकणार आहे. आता दोन्ही कंपन्यांनी "सेबी'च्या मंजुरीसाठी हे प्रस्ताव पाठविले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ujjivan Small Finance Bank shares make bumper debut on BSE NSE after listing