कर्मचाऱ्यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे इन्फोसिसचे स्पष्टीकरण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसने ताळेबंदात नफ्याची आकडेवारी चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा कर्मचाऱ्यांच्या गटाने केलेल्या तक्रारीत तथ्य आढळले नसल्याचे इन्फोसिसने म्हटले आहे.

बंगळूर : माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसने ताळेबंदात नफ्याची आकडेवारी चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा कर्मचाऱ्यांच्या गटाने केलेल्या (व्हिसलब्लोअर) तक्रारीत तथ्य आढळले नसल्याचे इन्फोसिसने सोमवारी (ता.4) राष्ट्रीय शेअर बाजाराकडे (एनएसई) स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात तिमाही आर्थिक निकाल जाहीर करणाऱ्या कंपनीच्या ताळेबंदात नफ्याची आकडेवारी फुगविण्यात आली असल्याचा आरोप इन्फोसिसमधील कर्मचाऱ्यांच्या गटाने केला होता. 

इन्फोसिसने राष्ट्रीय शेअर बाजाराला (एनएसई) दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कंपनीवर करण्यात आलेल्या आरोपाबाबत कोणताही प्रथमदर्शनी ठोस पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे आरोपात कोणतेही तथ्य नाही. कंपनीची लेखापरीक्षण समिती कायदेशीर सल्लागारांसोबत या प्रकरणाचा आणखी तपास करत आहे. याशिवाय कंपनीने स्वतंत्र लेखापरीक्षक म्हणून अर्नेस्ट अँड यंग या संस्थेची नियुक्ती केली असल्याची माहिती इन्फोसिसने "एनएसई'ला दिली आहे. ताळेबंदातील गैरव्यवहारप्रकरणी लेखी तक्रारीवर काय कारवाई केली, याबाबत "एनएसई'ने इन्फोसिसला खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. 

काय होते प्रकरण? 

कंपनीच्या संचालक मंडळाला उद्देशून लिहिलेल्या चार पानी पत्रात कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या गटाने आर्थिक ताळेबंदात गैरव्यवहाराचा आरोप केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांनी गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून त्यातील नफ्याची आकडेवारी खोटी असल्याचा दावा या कर्मचाऱ्यांनी पत्रात केला होता. या पत्रामुळे पारेख संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. 22 ऑक्‍टोबर रोजी कंपनीच्या व्यवस्थापनावर झालेल्या आरोपानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 14 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक घसरण झाली. परिणामी अवघ्या काही मिनिटांमध्ये गुंतवणूकदारांचे 45 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. दिवसअखेर (ता.4) इन्फोसिसचा शेअर 21 रुपयांनी वधारून 709 रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे तीन लाख एक हजार 325 कोटींचे बाजार भांडवल आहे. 

web title : Infosys' explanation of the fact that the employee's written complaint was not right
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infosys' explanation of the fact that the employee's written complaint was not right