व्याजदर कपातीने ठेवीदार हवालदिल !

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 31 जुलै 2019

ठेवी दर कमी होण्याची कारणे 
 जानेवारीपासून रेपो दरात पाऊण टक्‍क्‍याची कपात 
 अल्प बचतीच्या योजनांवरील व्याजदरात ०.१० टक्‍क्‍याची कपात 
 कर्ज वितरणात फारशी वाढ नाही 
 इतर उत्पन्न स्रोतांत घट 
 बॅंकांकडे पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्धता

मुंबई-  पुरेशी रोकड उपलब्धता, ठप्प पडलेले कर्ज वितरण आणि उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याने बॅंकांनी खर्चकपातीचा मार्ग अवलंबला आहे. त्यानुसार सार्वजनिक आणि खासगी बॅंकांनी ठेवींवरील व्याजदर कमी करण्याचा सपाटा लावल्याने कोट्यवधी ठेवीदार हवालदिल झाले आहेत. 

व्याजातून मिळणाऱ्या पुंजीवर अवलंबून असलेल्या निवृत्तिवेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना व्याजदर कपातीचा मोठा फटका बसणार आहे.  चालू वर्षात रिझर्व्ह बॅंकेने तीन वेळा रेपोदर कमी केला आहे. त्याशिवाय केंद्र सरकारने दुसऱ्या तिमाहीसाठी अल्पबचतीच्या योजनांच्या व्याजदरातसुद्धा ०.१० टक्‍क्‍याची कपात केली आहे. 

पहिल्या तिमाहीत अल्प बचतींचे व्याजदर ‘जैसे थे’ होते. त्यामुळे बॅंकांच्या व्याजदरावर दबाव वाढला आहे. औद्योगिक मंदीमुळे कर्जवितरणाला ओहोटी लागली आहे. ठेवींवर व्याज देणे परवडत नसल्याने बॅंका व्याजदराला कात्री लावत आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार ‘आरटीजीएस’, ‘एनईएफटी’ या सेवांवरील शुल्क रद्द केले. त्याचबरोबर किमान शिलकीची अट काही ठिकाणी शिथिल केली. उत्पन्नाचे स्रोत कमी झाले असून, बॅंकांना ठेवीदर कमी करण्यावाचून पर्याय उरलेला नाही, असे मत ज्येष्ठ बॅंकिंग तज्ज्ञ देविदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, की बॅंकांकडे चांगली कर्ज प्रकरणे येत नाहीत, ज्यामुळे कर्ज व्यवसायावर परिणाम झाला आहे. चालू खात्यावर कुठलेही व्याज नसून बचत खात्यावर ३.५ ते ४ टक्के व्याज दिले जाते. गेल्या वर्षभरापासून ठेवींचे दर सातत्याने कमी होत  आहेत. 

ठेवींमध्ये वाढता ओघ 
रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार ३१ मार्चअखेर सलग पाच तिमाहींमध्ये बॅंकांमधील ठेवींमधील निधीत दुहेरी आकड्यांत वृद्धी झाली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्‍चिम बंगाल या सात राज्यांचा एकूण ठेवींमध्ये दोन तृतीयांश हिस्सा आहे. शहरी भागांमधील बॅंक शाखांमध्ये एकूण ठेवी रकमेच्या ५१.३ टक्के ठेवी आहेत. 

मार्चअखेर ठेवी 
सर्व बॅंकांमधील ठेवी : १२५ लाख ६० हजार कोटी 
सार्वजनिक बॅंकांमधील ठेवी : ८४ लाख ३० हजार २७८ कोटी 
खासगी बॅंकांमधील ठेवी : ३६ लाख १० हजार कोटी 
‘एसबीआय’कडील ठेवी : २९ लाख ११ हजार ३८६ कोटी

ठेवी दर कमी होण्याची कारणे 
 जानेवारीपासून रेपो दरात पाऊण टक्‍क्‍याची कपात 
 अल्प बचतीच्या योजनांवरील व्याजदरात ०.१० टक्‍क्‍याची कपात 
 कर्ज वितरणात फारशी वाढ नाही 
 इतर उत्पन्न स्रोतांत घट 
 बॅंकांकडे पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्धता

या बॅंकांकडून ठेवीदराला कात्री 
‘एसबीआय’ने नुकतेच सर्व मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात अर्धा ते पाऊण टक्‍क्‍याची कपात केली. महिनाभरात आतापर्यंत बॅंक ऑफ बडोदा, एचडीएफसी बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, पीएनबी, ॲक्‍सिस बॅंक, आयडीएफसी फर्स्ट बॅंक, फेडरल बॅंक या बॅंकांनी ठेवीदर कमी केले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: interest rate deduction

टॅग्स