'रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट'च्या आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद

'रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट'च्या आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद

देशातील बांधकाम क्षेत्राला (रिअल इस्टेट) नवीन दिशा देणाऱ्या आयपीओला भारतीय गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद देत बांधकाम क्षेत्राचे उज्वल भविष्य अधोरेखित केले. एम्बसी ऑफिस पार्क्‍स या ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ने (आरईआयटी) भारतात पहिल्यांदाच पब्लिक इश्‍यू सादर केला आहे. त्याला संस्थात्मक तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी अनुक्रमे दोन ते अडीचपट तर एचएनआयने (उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती) तीन टक्क्यांपेक्षा जास्त प्रतिसाद नोंदविला. 

एम्बसी आरईआयटी ही मुख्यत: ब्लॅकस्टोन ग्रुप आणि एम्बसी प्रॉपर्टी डेव्हेलपर्स प्रा. लि. यांच्याकडून नियंत्रित केला जातो. या आयपीओद्वारे 4,750 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचे उद्दिष्ट आहे. 

महत्वाचे म्हणजे, किमान लॉट साईझ 800 युनिट आणि त्यानंतर 400 युनिटच्या पटीत गुंतवणूक यामुळे कमीतकमी 2 लाख 40 हजार रुपयांची गुंतवणूक करणे अपेक्षित असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे होते. मात्र, रिटेल प्रकारात तब्बल अडीचपट तर संस्थात्मक प्रकारात दुपटीपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. 

काय आहे आरईआयटी?
‘आरईआयटी’ हा एक असा गुंतवणुकीचा नवा प्रकार आहे, की ज्यायोगे गुंतवणूकदारांना स्वत-ला प्रत्यक्ष रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक न करावी लागता रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे फायदे मिळू शकतात. सध्यातरी भारतात, भाड्याने किंवा ‘लीज’वर दिलेल्या व्यावसायिक जागेचा समावेश ‘आरईआयटी’मध्ये करण्यात आलेला आहे. अशा जागांमधून, खर्च वजा जाता मिळणाऱ्या उत्पन्नापैकी कमीत कमी 90 टक्के वाटा युनिटहोल्डरना लाभांशाच्या स्वरूपात वाटणे हे ‘सेबी’च्या नियमांनुसार बंधनकारक आहे. तसेच ‘आरईआयटी’ने केलेली 80 टक्के गुंतवणूक ही पूर्ण झालेल्या ‘प्रोजेक्‍ट’मध्ये करणे बंधनकारक आहे. मोठ्या शहरांत ‘ऑफिस स्पेस’साठी चांगली मागणी असल्याने व भाडे सतत वाढत असल्याने गुंतवणूकदारांना सुमारे 7-8 टक्के वार्षिक परतावा मिळणे अपेक्षित आहे.

भविष्य काय? 
भारताचे ‘आयटी’ क्षेत्रातील वाढते महत्त्व लक्षात घेऊन गुगल, मायक्रोसॉफ्ट, जेपी मॉर्गन, वेल्स फार्गो यासारख्या अनेक जागतिक दर्जाच्या ‘फॉर्च्युन 500’ कंपन्यांनी भारतातील मोठ्या शहरात कार्यालये घेतली आहेत. या कंपन्या स्वत: कार्यालये खरेदी न करता ती दीर्घ मुदतीच्या कराराने ‘लीज’वर जागा घेणे पसंत करतात. त्यामुळे अशा ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्या ‘आरईआयटी’ला नियमित व खात्रीशीर उत्पन्न मिळू शकते. परंतु, देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी आल्यास अथवा ‘ऑफिस स्पेस’ बराच काळ रिकामी पडून राहिल्यास ‘आरईआयटी’च्या उत्पन्नावर व गुंतवणूकदारांच्या परताव्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com