भारतीय IT उद्योगाचे अमेरिकन रोजगारात मोठे योगदान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

'फॉर्च्युन 500'मधील 75 टक्के कंपन्यांना 'आयटी' उद्योग सेवा देत आहे. यामुळे या कंपन्या अधिक कार्यक्षम, जागतिकदृष्ट्या स्पर्धात्मक होत आहेत. यामुळे एकप्रकारे 'आयटी' उद्योग अमेरिकेतील रोजगारनिर्मितीला चालना देत आहे. 
- आर. चंद्रशेखर, अध्यक्ष, नॅसकॉम

वॉशिंग्टन : अमेरिकेत 'एच-1बी' व्हिसावरून राजकीय आणि भावनिक चर्चा सुरू आहे. यात वस्तुस्थिती टाळून मते मांडण्यात येत आहेत. प्रत्यक्षात भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाने अमेरिकी अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीत प्रचंड योगदान दिले आहे, असे 'नॅसकॉम'ने स्पष्ट केले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने 'एच-1बी' व्हिसावर निर्बंध टाकण्याचे पाऊल उचलले आहे. यामुळे 'आयटी' उद्योगाची संघटना 'नॅसकॉम'च्या शिष्टमंडळाने अमेरिकेतील संसद सदस्य, नेते, थिंक टॅंकचे सदस्य, अधिकारी यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने 'एच-1बी' व्हिसाबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

'नॅसकॉम'चे अध्यक्ष आर. चंद्रशेखर म्हणाले, 'भारतीय 'आयटी' कर्मचारी अमेरिकेत जाऊन तेथील नागरिकांचे रोजगार हिरावून घेतात, असे बोलले जात आहे. अमेरिकी कर्मचाऱ्यांना ते विस्थापित करीत आहे. भारतीय कर्मचारी कमी वेतन घेणारे फारसे उच्च कौशल्य नसलेले असून, ते कुशल आणि चांगले वेतन घेणाऱ्या अमेरिकी कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावून घेत असल्याची चर्चा सुरू आहे. हे सगळे भावनिकदृष्ट्या मांडले जात आहे. मात्र, आपण वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. वस्तुस्थिती पाहिल्यास चित्र खूपच वेगळे दिसते''

'आकडेवारी ही केवळ आकडेवारी नसते, मात्र, अमेरिकी सरकारची आकडेवारी खूप वेगळी गोष्ट सांगते. भारतीय 'आयटी' उद्योगाने अमेरिकी अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीत प्रचंड योगदान प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे दिले आहे. अमेरिकेत 2015 मध्ये पाच लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्मितीला 'आयटी'ने पाठबळ दिले. इतर उद्योगांमध्ये रोजगारवाढीचा वेग 2 टक्के असताना 'आयटी' उद्योगात हा वेग 10 टक्के आहे,'' असे त्यांनी सांगितले.

'फॉर्च्युन 500'मधील 75 टक्के कंपन्यांना 'आयटी' उद्योग सेवा देत आहे. यामुळे या कंपन्या अधिक कार्यक्षम, जागतिकदृष्ट्या स्पर्धात्मक होत आहेत. यामुळे एकप्रकारे 'आयटी' उद्योग अमेरिकेतील रोजगारनिर्मितीला चालना देत आहे. 
- आर. चंद्रशेखर, अध्यक्ष, नॅसकॉम

Web Title: IT companies serve 75 percent of fortune 500