‘आयटीआर-व्ही’साठी सुधारित कालमर्यादा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tax

‘आयटीआर -व्ही’साठी सुधारित कालमर्यादा

कें द्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्राप्तिकर विवरणपत्राच्या पडताळणीसाठी भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे प्राप्तिकर विभागात सादर करावा लागणाऱ्या ‘आयटीआर-व्ही फॉर्म’ (ITR-V) दाखल करावयाच्या कमाल कालमर्यादेत आता आमुलाग्र बदल केला आहे. दाखल केलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रावर त्वरीत कार्यक्षम क्रिया करण्यासाठी हा ‘फॉर्म’ करदात्याकडून अधिक लवकर वेळात दाखल होणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे बदल ?

सध्या प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर जास्तीत जास्त १२० दिवसाच्या आत हे विवरणपत्र अर्थात ‘आयटीआर-व्ही फॉर्म’ पडताळणी करून भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे दाखल करावाच लागतो. आता हा कालावधी सीबीडीटीने २९ जुलै २०२२ रोजी अधिसूचना ओसी/२०२२ काढून १२० दिवसांवरून ३० दिवसांपर्यंत कमी केला आहे.

आता हा ‘फॉर्म’ वक्तशीरपणे अंतिम मुदतीत दाखल न करणाऱ्या करदात्यास विलंब शुल्क व इतर प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार आहे. तथापि, हा कमी केलेला कालावधी १ ऑगस्ट २०२२ रोजी आणि त्यानंतर दाखल करण्यात येणाऱ्या प्राप्तिकर विवरणपत्रांना लागू होणार आहे.

ज्या दिवशी इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे प्राप्तिकर विवरणपत्र प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल त्या दिवसापासून हा ३० दिवसांचा कालावधी मोजण्यात येणार आहे.

करदात्याने भौतिक पद्धतीने सही करून ‘आयटीआर-व्ही फॉर्म’ प्राप्तीकर विभागाकडे केवळ स्पीड पोस्टने पाठविली असेल तर, स्पीडपोस्टच्या पावतीवरील तारखेपासून ३० दिवसांची कालमर्यादा मोजली जाणार आहे. सबब करनिर्धारण होईपर्यंत स्पीडपोस्ट केल्याची पावती जपून ठेवावी लागणार आहे. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने भौतिक पोहोच पावती दाखल करता येणे आता खात्रीचे राहिलेले नाही.

३१ जुलै २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी दाखल केलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रासाठी कोणत्याही आकारणी वर्षासाठी भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे दाखल करावयाचा ‘आयटीआर-व्ही फॉर्म’ पाठविण्याची कालमर्यादा पूर्वी प्रमाणेच १२० दिवसांची आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

‘आयटीआर-व्ही फॉर्म’ मुदतीत दाखल न केल्यास होणारे परिणाम ः

‘आयटीआर-व्ही फॉर्म’ हा इलेक्ट्रॉनिक किंवा भौतिक पद्धतीने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्याच्या तारखेनंतर ३० दिवसांच्या नंतर अपलोड किंवा पोस्टाने दाखल केल्यास तो दाखल न झाल्याने अगोदर अपलोड केलेले प्राप्तीकर विवरणपत्र दाखल केलेच नाही असे समजले जाईल.

करदात्यास अशा बाबतीत उत्पन्न व इतर तीच माहिती पुन्हा अपलोड करून त्या दिवसापासून पुन्हा ३० दिवसांच्या आत ‘आयटीआर-व्ही फॉर्म’ इलेक्ट्रॉनिक किंवा भौतिक पद्धतीने पुन्हा दाखल करावा लागेल.

उशिराने दाखल केलेला ‘आयटीआर-व्ही फॉर्म’ मुळे कायद्यांतर्गत उशीरा प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यामुळे होणाऱ्या सर्व परिणामास तोंड द्यावे लागेल.

अ. कलम २३४एफ़ अंतर्गत उत्पन्न रु पाच लाखांपेक्षा अधिक असल्यास रु. पाच हजाराचे तर करपात्र उत्पन्न रु. पाच लाखांपेक्षा कमी असल्यास रु. एक हजाराचे विलंब शुल्क लागेल.

ब. असे विवरणपत्र देय-मुदतीबाहेरचे (बिलेटेड)प्राप्तिकर विवरणपत्र म्हणून मानले जाऊन ज्या तारखेस मुदतीत जर दाखल विवरणपत्र दाखल झाले असते तर त्या दिवसापासूनचे रिफंड मिळण्यापर्यंतच्या तारखेपर्यंत सहा टक्के दराने व्याज मिळाले असते ते व्याज मिळणार नाही.

क. व्यवसायातून, सट्टेबाजीतून, भांडवली स्वरूपाचा व इतर स्रोतातून येणारा तोटा पुढे ओढता येणार नाही. यात घरापासून येणाऱ्या तोट्याचा समावेश असणार नाही

ड. असे मुदत संपल्यानंतरचे विवरणपत्र फक्त आकारणी वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंतच दाखल करता येईल. म्हणजे आर्थिक वर्ष २०२१-२२ या ३१ मार्च २०२२ ला संपलेल्या वर्षासाठी हे विवरणपत्र दाखल करण्याच्गी अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२२ आहे.

इ. विलंब शुल्क, व्याज व अतिरिक्त कर देऊन नवीन उपलब्ध असलेले ‘अपडेटेड’ विवरणपत्र ३१ मार्च २०२४ पर्यंत भरता येईल.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट- सीए आहेत.)

Web Title: Itr V Revised Time Limit Verification Of Income Tax Return

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..