
आयटी सेक्टरमधील 95 टक्के सीईओंना आशा आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत 2021 मध्ये या क्षेत्रात जास्त नोकऱ्या उपलब्ध होतील.
मुंबई - कोरोनामुळे जगात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. यासह वेगवेगळ्या क्षेत्रालाही फटका बसला. आता कोरोनावर लसीकरण सुरु झाल्यानंतर हळू हळू जनजीवन पूर्वपदावर येत असून उद्योगधंदेही सुरू झाले आहेत. दरम्यान कोरोनाच्या संकटानंतरही आयटी सेक्टरने जीडीपीमध्ये जवळपास 8 टक्के इतकं योगदान दिलं आहे. आता NASSCOM च्या सर्वेनुसार अशी माहिती समोर आली आहे की, आयटी सेक्टरमधील 95 टक्के सीईओंना आशा आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत 2021 मध्ये या क्षेत्रात जास्त नोकऱ्या उपलब्ध होतील.
आयटी क्षेत्रातील तब्बल 67 टक्के सीईओंच्या मते आर्थिक वर्ष 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये चांगलं काम होऊ शकतं. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 2.3 टक्के माहिती सेवा क्षेत्रातील उत्पन्नाच्या वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच गेल्या वर्षी 190 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात आयटी कंपन्यांची उलाढाल ही 194 बिलियन डॉलर असल्याचा आंदाज आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या सहामाहीत टॉप भारतीय आयटी कंपन्यांनी विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
हे वाचा - राम मंदिर देणगीवरुन कुमारस्वामी म्हणाले, नाझींनी जर्मनीत जे केलं तेच RSS करतंय
कोरोनाच्या संकटकाळात डिजिटल ट्रान्सफर्मेशन आणि कंपन्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात दाखवलेली तत्परता यामुळे ही वाढ झाली. आयटी उद्योग विभागाने त्यांच्या समीक्षेत म्हटलं की, डिजिटल ट्रान्सफर्मेशन आणि डिजिटल अभ्यासात आयटी सेक्टरचं वाढीमध्ये योगदान मोठं असल्याचं म्हटलं आहे. आयटी इंडस्ट्रीच्या महसूलाचं योगदान 28 ते 30 टक्के इतकं होतं.
वर्षभरात कोरोनामुळे निर्बंध घातलेले असतानाही आयटी सेक्टरने जीडीपीमध्ये मोठं योगदान दिलं. सेवा निर्यातीमध्ये 52 टक्के भागिदारी ही आयटी क्षेत्राची होती. एप्रिल ते सप्टेंबर 2020 पर्यंत एकूण प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुकीत 50 टक्के याचं योगदान होतं. आयटी क्षेत्रातील उत्पन्न वाढ मुख्यत्वे ई कॉमर्समधून झालं. ज्यामध्ये 4.8 टक्के वाढून 57 बिलियन डॉलर इतकं झालं. तर हार्डवेअरमध्ये 4.1 टक्के वाढ होऊन महसूल 16 बिलियन डॉलर इतका वाढला.
हेही वाचा- पावरी सोडा, हे बघा! पाकिस्तानी मुलीच्या पार्टी व्हिडिओवर स्मृती इराणींची प्रतिक्रिया
आयटी कंपन्यासुद्धा नोकऱ्या देण्यामध्ये आघाडीवर होत्या. इतर सेक्टरमधील अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात, वेतन कपात होत होती. आता आगामी वर्षात आयटी सेक्टर दिलासा देऊ शकते. 2021 मध्ये या क्षेत्रात 1 लाख 40 हजार इतक्या कर्मचाऱ्यांना काम मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2021 च्या अखेरपर्यंत 44 लाख नोकऱ्या आयटी क्षेत्रात मिळतील असा अंदाज 95 टक्के सीईओंनी व्यक्त केला आहे.