आयपीओ आणायचं स्वप्न आहे? 

IPO
IPO

अनेक गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळत असताना अनेक स्टार्टअप्सही आता शेअर बाजाराकडे वळू लागल्या आहेत. प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) करून कंपन्या शेअर बाजारात उतरू शकतात. 

आयपीओचा विचार का करायचा?
मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारण्यासाठी कंपन्यांनी अशा प्रकारे शेअर बाजारात उतरणे हा उत्तम मार्ग असतो. बँकांकडून कर्ज मिळवणे हा सोपा पर्याय असला, तरी त्यांचे व्याजदर हे ओझे बनते. तसेच विशिष्ट वेळी विशिष्ट निधीच मिळतो आणि बँकेने त्या कंपनीचे जोखीम आणि आर्थिक विश्लेषण कसे केले आहे, त्यावरही ते अवलंबून असते. आयपीओच्या माध्यमातून साहसवित्त कंपन्या, वैयक्तिक संस्थापक यांना त्यांची गुंतवणूक नफ्याच्या रूपात बाहेर काढण्याची सुविधा मिळते. आयपीओमध्ये भांडवल उभारणी होतेच, त्याबरोबर कंपनी बाजारात अधिक ठळकपणे दिसत असल्याने नवीन ग्राहक मिळवणे किंवा बाजार हिस्सा वाढवणे यांच्या माध्यमातून कंपनीची विश्वासार्हता वाढण्यासही बळ मिळते.

जस्टडायल, मेकमायट्रिप, भारतमॅट्रिमनी, इन्फोसिस या कंपन्या एके काळी स्टार्टअप्स होत्या. त्यांनी शेअर बाजारात नोंदणी केली आणि त्या सार्वजनिक बनल्या. नुकतेच ‘निका’ या कंपनीनेही या वर्षअखेरीपर्यंत किंवा २०२२च्या सुरुवातीस प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) करायचे ठरवले आहे. भारतात खूप कमी कंपन्या अशा प्रकारे शेअर बाजारात जात असल्या, तरी बहुसंख्य कंपन्यांच्या संस्थापकांचे ते स्वप्नही असते. ‘हॅप्पीएस्ट माइंड्स’, ‘रूट मोबाईल’ आणि ‘बर्गर किंग’ अशा कंपन्यांच्या आयपीओंना मिळालेल्या प्रतिसादानेही अनेक स्टार्टअप्सचा उत्साह वाढला आहे. 

अर्थात, नफ्यात चालणाऱ्या कंपनीने आयपीओ कशाला आणायला पाहिजे, असा प्रश्न कोणत्याही उद्योगाला किंवा स्टार्टअपला पडू शकतो. जर त्यांना तसे वाटले, तर आयपीओसाठी प्रक्रिया काय, असाही प्रश्न मनात येऊ शकतो. आपीओंमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना रस निर्माण झाला आहे, याचं कारण अशा प्रकारच्या गुंतवणुकांवर दीर्घकालीनदृष्ट्या विचार केल्यास होणारा जबरदस्त फायदा. एक उदाहरण म्हणजे इन्फोएज इंडिया लिमिटेडच्या (नौकरी डॉट कॉम) आयपीओचे. ३० ऑक्टोबर २००६ला हा आयपीओ बाजारात आला, तेव्हा त्याची किंमत होती प्रति शेअर २९० ते ३२० रुपये. सध्याच्या काळात या शेअरची किंमत ५३०० रुपयांच्या आसपास आहे.

ज्या कंपनीला विस्तार करायचा आहे, त्यांना भांडवलाची गरज भासते. सर्वसाधारणपणे हे भांडवल या मार्गांनी उभारता येऊ शकते - 
एंजल इन्व्हेस्टर्स - ज्या कंपन्या अगदी प्राथमिक टप्प्यावर आहेत त्यांच्यामध्ये असे गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक तुलनेने व्यवसायाच्या मोठ्या हिश्श्यासाठी केली जाते. 

साहसवित्त गुंतवणूक (व्हीसी) फर्म्स - अशा कंपन्या मोठी गुंतवणूक करतात आणि ती साधारणपणे तीन ते पाच वर्षांसाठी असते. ज्या कंपन्यांचे बिझनेस मॉडेल सिद्ध झाले आहे अशा प्राथमिक टप्प्यावरच्या कंपन्यांमध्ये ते गुंतवणूक करतात. 

साहस कर्ज (व्हेंचर डेट) - याला साहस कर्ज (व्हेंचर लेंडिंग) असेही म्हटले जाते. या प्रक्रियेत साहसवित्त गुंतवणूक कंपनी कर्जाच्या स्वरूपात भांडवल देते. यात त्या कंपनीला तुलनेने कमी हिस्सा द्यावा लागत असल्याने या प्रकाराला जास्त पसंती दिली जाते. 

बँक कर्ज - कर्जाच्या स्वरूपात भांडवल उभारणे ही अगदी सर्वसाधारण प्रक्रिया आहे. यात हिस्सा द्यावा लागत नसल्याने उद्योगाच्या मालकाकडे पूर्ण नियंत्रण राहते.

आयपीओ - एखाद्या कंपनीला मोठ्या प्रमाणात विस्तार करायचा असतो आणि त्यांचे बिझनेस मॉडेल सिद्ध झालेले असते, अशा वेळी प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) केली जाते. साहसवित्त कंपन्या किंवा संस्थापकांपैकी काहींना कंपनीतून विशिष्ट लाभासह बाहेर पडायचे असल्यासही आयपीओचा अवलंब केला जातो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयपीओसाठीची पात्रता

  • आयपीओसाठी मुळात सेबीच्या अटी आणि नियमांच्या चौकटीत असणे अनिवार्य आहे. सेबीने भांडवली बाजारात मज्जाव केला असल्यास, तुम्ही स्वतःहून दिवाळखोरी जाहीर केली असल्यास किंवा आर्थिक गुन्ह्यांसाठी फरार असल्यास तुम्ही आयपीओसाठी पात्र नसाल.
  • आयपीओचा विचार करत असाल, तर त्यापूर्वीची अनेक वर्षे विविध नियम आणि अटींचे पालन करण्याची खबरदारी घ्या. सर्व वैधानिक विवरणपत्रे भरली असतील आणि कर्जे थकीत नसतील याची काळजी घ्या. 
  • आयपीओसाठी किमान नेट टँजिबल ॲसेट्स तीन कोटी रुपये, किमान सरासरी ऑपरेटिंग प्रॉफिट १५ कोटी रुपये आणि किमान नेटवर्थ १ कोटी रुपये असणे आवश्यक असते.
  • तुम्ही या सगळ्या निकषांत बसत असल्यास उत्तम, अन्यथा त्यातल्या उलाढालविषयक मर्यादांत बसण्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. आयपीओ आणण्यावर ठाम असल्यास इतरही अनेक तांत्रिक निकष तुम्हाला माहीत होतील-ज्यांचे पालन तुम्हाला करावे लागेल.

यांच्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या
कंपनीची शेअर बाजारात नोंदणी होण्यामध्ये अनेक स्टेकहोल्डर्स महत्त्वाचे ठरत असतात. उदाहरणार्थ, कंपनीला एक बुक रनिंग लीड मॅनेजर (बीआरएलएम) लागतो- जो सर्व व्यवहार, व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या, बिझनेस प्लॅन्स तयार करणे इत्यादी गोष्टींची काळजी घेऊ शकतो; संस्थात्मक आणि बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी विकसित करू शकतो; तसेच इतर गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो. याचबरोबर आयपीओसाठी या काही व्यक्तींची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. 

ऑडिटर्स :ऑफर डॉक्युमेंटमध्ये कंपनीने सादर केलेल्या आर्थिक बाबींची अचूकता हे पटताळून बघतात. 

रजिस्ट्रार्स : हे आयपीओसाठी गुंतवणूकदारांकडून ॲप्लिकेशन फॉर्म्स स्वीकारत असतात. याचबरोबर, एस्क्रो खाती, शेअरचे डिमॅटेरिअलायझेशन, एससीएसबी, बीआरएलएम इत्यादी तांत्रिक गोष्टी; तसेच सेबीसाठी अहवाल तयार करणे आदी गोष्टींची जबाबदारी त्यांच्याकडे असते. 

जाहिरात एजन्सी : आयपीओशी संबंधित प्रसिद्धीशी निगडित गोष्टी या एजन्सी बघतात. 

प्रिंटर्स : डीआरएचपी/ आरएचपी/प्रोस्पेक्टस, ॲप्लिकेशन फॉर्म्स, इतर स्टेशनरी प्रिंट करणे ही जबाबदारी यांच्याकडे असते.  

आयपीओ मॉनिटरिंग एजन्सी : जे आयपीओ शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढालीचे असतात, त्यांच्यासाठी ही एजन्सी महत्त्वाची असते. आयपीओंमधून जो निधी उभारण्यात आला आहे त्यावर; तसेच ऑफर डॉक्युमेंटमध्ये हा निधी कशासाठी वापरणार हे सांगितले आहे, त्याच गोष्टींसाठी या निधीचा योग्य विनियोग होत आहे ना त्यावर या एजन्सी देखरेख ठेवत असतात. 
 

एस्क्रो बँक : आयपीओसाठी अर्ज करताना गुंतवणूकदाराला जो निधी भरावा लागतो तो स्वीकारणे आणि ॲलॉटमेंटनंतर राहिलेला निधी पुन्हा त्या त्या गुंतवणूकदाराला परत करणे या संदर्भात या बँका काम करतात. खरेदीदाराने आयपीओसाठी बोली लावताना सांगितलेली रक्कम त्याने नंतर दिली नाही असे होऊ नये या दृष्टीने त्या कंपनीच्या हितांचे रक्षण करण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी ठरते. 
 

स्पॉन्सर बँक : ही शेअर बाजार आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांच्यात एक प्रकारची मध्यस्थ म्हणून काम करते. 

कालावधी
आयपीओच्या एकूण प्रक्रियेत बुक रनिंग लीड मॅनेजर (बीआरएलएम) नेमण्यापासून लिस्टिंग म्हणजे नोंदणीपर्यंत अनेक तांत्रिक गोष्टी महत्त्वाच्या आणि अनिवार्य असतात आणि प्रत्येक टप्प्यासाठी वेगवेगळा कालावधी लागू शकतो. ही प्रक्रिया दीर्घ असते आणि त्यासाठी सहा महिन्यांपासून वर्षापर्यंत किंवा काही वेळा त्यापेक्षाही जास्त काळ लागू शकतो.

यशाचे ‘सूत्र’
आयपीओ आणण्याचे अनेक उपयोग असले, तरी कंपनी अशा प्रकारे सार्वजनिक होण्यापूर्वी प्रवर्तकांकडे जी स्वायत्तता असते ती आयपीओनंतर जाते, ही गोष्टही महत्त्वाची. कंपनीवर अतिरिक्त जबाबदाऱ्या येतात आणि मोठ्या गुंतवणूकदार समूहाला, तसेच नियामक यंत्रणांना त्या उत्तरदायी असतात. त्यामुळे नंतरच्या काळातही यश कायम ठेवायचे असेल, तर उत्तम प्रशासन, हेच त्याचे उत्तर असते.

पुढच्या लेखात आपण ज्या कंपन्यांची उत्पादने आपण आपल्या आयुष्यात कधी ना कधी वापरली आहेत अशा काही स्टार्टअप्सचा प्रवास जाणून घेऊ. कल्पना ते आयपीओ हा त्यांचा प्रवास कसा झाला, हे जाणून घेण्यासाठी काहींच्या संस्थापकांशीही संवाद साधू.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com