जाणून घ्या टाटाच्या प्रीमियम हॅचबॅक कार 'अल्ट्रोज'बद्दल

चंद्रकांत दडस
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

टाटा कंपनीला प्रीमियम हॅचबॅकमध्ये एका गाडीची उणीव भासत होती. त्यामुळे टाटा कंपनी नव्याने सादर करत असलेल्या बहुप्रतीक्षित टाटा अल्ट्रोजने ही मोठी उणीव दूर होण्यास मदत होणार आहे.

इंडिका आणि टाटा टिआगो या टाटा मोटर्ससाठी गेम चेंजर हॅचबॅक ठरल्या. इंडिकाने टाटा मोटर्सला प्रवासी वाहनांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करून दिली, तर टिआगोने मंदीच्या काळात कंपनीला मोठी स्थिरता मिळवून दिली. या दोन्ही हॅचबॅक टाटा मोटर्ससाठी अतिशय यशस्वी ठरल्या. असे असताना कंपनीला प्रीमियम हॅचबॅकमध्ये मात्र एका गाडीची उणीव भासत होती. आता टाटा कंपनी नव्याने सादर करत असलेल्या बहुप्रतीक्षित टाटा अल्ट्रोजने ही मोठी उणीव दूर होण्यास मदत होणार आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांमध्ये बाजारात दाखल होत असलेली ही प्रीमियम हॅचबॅक नेमकी कशी आहे, याचा घेतलेला हा आढावा...

सुझूकीच्या सुसाट एस्टीम कारचा इतिहास

राजस्थानमधील जैसलमेर शहरात फिरण्यासाठी खूप असे काही नाही. सपाट विस्तीर्ण प्रदेशात पाण्याचा दुष्काळ असल्याने माणसेही अधिक दिसत नाहीत. मात्र येथे असणारे राजवाडे आणि सकाळी कोवळ्या उन्हात त्यांच्यावर पडलेली किरणे यामुळे हे राजवाडे सोनेरी असल्याचा फील होतो. हाच सोनेरी रंगाचा फिल नवीन हॅचबॅक अल्ट्रोजमध्ये करून देण्यात आला आहे. या गाडीत सोन्याचे स्टॅंर्डड (मानके) असल्याचा कंपनीने दावा केला आहे. अर्थात ही मानके सुरक्षा आणि गाडीच्या कार्यक्षमतेविषयीची आहेत.

टाटा अल्ट्रोजने आपली सुरुवात टाटा ४५ एक्‍स कन्सेप्ट कार म्हणून केली होती, जी प्रथम दिल्ली येथील २०१८ च्या वाहन मेळाव्यात सादर करण्यात आली. टाटा अल्ट्रोजचे पहिले उत्पादन २०१९ च्या जिनेव्हा येथील वाहन मेळाव्यात सादर करण्यात आले होते. अल्ट्रोज हे नाव अल्बट्रॉस या पक्ष्यापासून ठेवण्यात आले आहे. या पक्ष्याचे ९० अंशात असणारे पंख आणि अल्ट्रोजमध्येही दरवाजा ९० अंशात उघडण्याची सोय असल्याने कंपनीला हे नाव सुचले. नव्या अल्फा आर्किटेक्‍चर प्लॅटफॉर्मवर तयार केलेले अल्ट्रोजचे डिझाईन आहे. त्यामुळे ही हॅचबॅक आवश्‍यकतेनुसार विजेवर चालण्यासाठीही सज्ज करण्यात आली आहे.

बाह्य रचना

टाटा अल्ट्रोजकडे एक नजर टाकली की ती लगेच आपल्याला आवडते. टाटा मोटर्सच्या प्रताप बोस यांच्या नेतृत्वात अल्ट्रोज अतिशय उत्तम प्रकारे डिझाईन केलेली कार आहे. गाडीच्या समोरील भागात असलेले हनीकॉम्ब मेश ग्रिल, स्लीक हेडलॅम्प्स आणि रायझिंग विंडो लाइन यामुळे गाडी अतिशय उठून दिसते. या कारची लांबी ३ हजार ९९० एमएम, रुंदी १७५५ एमएम आणि उंची १५२३ एमएम आहे. या प्रीमियम हॅचबॅक कारचा व्हिलबेस २५०१ एमएम आणि ग्राऊंड क्‍लिअरन्स १६५ एमएम इतका आहे. अधिक प्रमाणात असलेल्या ग्राऊड क्‍लिअरन्समुुळे गाडी अधिक वेगात स्पीड ब्रेकरवर आदळली तरी याचा तितकासा परिणाम जाणवत नाही. तर कारच्या पेट्रोल आवृत्तीचे वजन १०३६ किलोग्रॅम आणि डिझेल आवृत्तीचे वजन ११५० किलोग्रॅम आहे. ३७ लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी आहे. मागील बाजूला विंडस्क्रीनच्या खाली टेलगेटवर ब्लॅक एलिमेंट आहे, त्यालाच टेललॅम्पही आहे. परिणामी कारचा लूक अत्यंत आकर्षक दिसतो.

अंतर्गत रचना

टाटा अल्ट्रोजमध्ये तुम्ही पाय ठेवल्यावर तुम्हाला आतील मोकळी आणि अधिक प्रशस्त जागा तुमच्या लगेच लक्षात येईल. यावेळी सगळ्यात लक्षात येणारी बाब म्हणजे ९० अंशात उघडणारे दरवाजे. हा प्रयोग प्रथमच या सेगमेंटमध्ये करण्यात आला आहे. कारला एक नवीन आणि वेगळ्या प्रकारे डिझाईन केलेले डॅशबोर्ड बसवण्यात आले आहे, ज्यात मउसर निळा रंग प्रकाशित होतो. रात्रीच्या वेळेस हा रंग अधिक खुलून दिसतो. कारमध्ये अँड्रॉईड ऑटो आणि ॲपल कारप्ले सपोर्टसह ७-इंच फ्री-स्टॅंडिंग टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट प्रणाली आहे. याशिवाय यात पावर विंडो, इंजिन पुश बटन स्टार्ट/स्टॉप, फास्ट चार्जिंग, स्मार्ट की, रिअर एसी व्हेंट्‌स, इलेक्‍ट्रिक टेलगेट, क्रूझ कंट्रोल, रेन सेंसिंग वायपर, आयडल स्टार्ट स्टॉप आणि ऑटो हेडलॅम्पसह अन्य अनेक फीचर्स देण्यात आली आहेत.

गाडीमध्ये इकोनॉमी आणि सिटीमोड देण्यात आले आहेत. अल्ट्रोजचे स्टेअरिंग इतर टाटा मोटर्सच्या गाड्यांच्या तुलनेत अधिक मऊ आणि हाताळण्यास सोपे आहे. स्टेअरिंगवर अनेक सुविधा देण्यात आल्या असून, हाताच्या बोटांवर आपण अगदी हॉर्न वाजवणे, आवाज कमी जास्त करणे यासह अनेक कामे करू शकतो. गाडीची आसने अधिक आरामदायी आहेत. मागील सीटसाठी अधिक जागा देण्यात आली असून, तीन प्रवासी अगदी आरामात बसू शकतात. गाडीतील ड्रायव्हरचे सीट अधिक उत्तम असून, यामुळे समोरील बाजू अगदी स्पष्टपणे पाहता येते. गाडीमध्ये सामान ठेवण्यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत, जे भारतीय प्रवाशांना हवेहवेसे असतात. छत्री ठेवण्यासाठी कप्पा असून, पाणी बॉटल तसेच लहान सहान वस्तू ठेवण्यासाठी दरवाजाला अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सुरक्षा वैशिष्ट्ये

सुरक्षेसाठी या कारमध्ये ड्युअल एअर बॅग, ईबीडीसह एबीएस, रिअर पार्किंग सेंसर्स, सीटबेल्ट रिमाइंडर, स्पीड सेंसिंग ऑटो डोर लॉक, इंजिन इम्मोबिलायजर, इसोफिक्‍श, चाइल्ड सीट माउंट्‌स आणि कॉर्नरिंग फॉग लॅंप यांसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. मात्र दोन एअर बॅग फक्‍त पुढील प्रवाशांसाठी देण्यात आल्या असून, मागील प्रवाशांसाठी आणखी दोन एअर बॅग्जची गरज भासते.

चालवण्याचा अनुभव

पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांमधील अल्ट्रोज चालवण्याचा अनुभव घेतला. येण्याजाण्यासाठीचे अंतर २४० किमीपेक्षा अधिक होते. त्यामुळे गाडी चालवताना गाडीच्या क्षमतेचा अंदाज आला. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल इंजिन असलेली अल्ट्रोज अधिक पिकअप घेताना दिसून आली. पाचव्या गिअरमध्ये डिझेल अल्ट्रोज अपेक्षापेक्षा अधिक वेग घेते. ज्यावेळी ती अधिक वेग घेते त्यावेळी ती कसलेली संतुलन न ढासळता सतत अंतर कापत राहताना दिसते. पेट्रोल पर्यायामध्ये गाडी चौथ्या गिअरवर अधिक वेग घेते. मात्र पाचव्या गिअरमध्ये ती डिझेल इतका परफॉर्मन्स देत नाही. मात्र अल्ट्रोज प्रीमियम हॅचबॅक चालवण्याचा अनुभव अतिशय भन्नाट असून, यामुळे या श्रेणीतील मारुती सुझुकी बलेनो, ह्युंदाई इलाइट आय २० आणि होंडा जझ या गाड्यांना टक्‍कर मिळणार, हे नक्‍की आहे.

web title : Learn about Tata's premium hatchback car altroz


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Learn about Tata's premium hatchback car altroz