esakal | एलआयसीची मोठी घोषणा: आता पॉलिसीचा मॅच्युरिटी क्लेम कुठूनही करा 
sakal

बोलून बातमी शोधा

lic.

कोरोनाच्या काळात लाईफ इन्शुरन्स पॉलिसी क्षेत्रात खूप मोठे बदल झाले. या काळात आरोग्य आणि जीवन विम्याचं महत्त्व सर्वसामान्यांच्या लक्षात आलं.

एलआयसीची मोठी घोषणा: आता पॉलिसीचा मॅच्युरिटी क्लेम कुठूनही करा 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात लाईफ इन्शुरन्स पॉलिसी क्षेत्रात खूप मोठे बदल झाले. या काळात आरोग्य आणि जीवन विम्याचं महत्त्व सर्वसामान्यांच्या लक्षात आलं. या गोष्टीकडं सातत्यानं टाळाटाळ करणाऱ्यांनी आता मोठ्या प्रमाणावर जीवन विमा आणि आरोग्य विमा घेण्यास सुरुवात केली आहे. या परिस्थितीचा लाभ खासगी विमा कंपन्यांबरोबरच एलआयसीनेही घेण्यास सुरुवात केली आहे. एलआयसी सध्या नव नवीन पॉलिसी लाँच करत आहेत. तसेच त्यांनी टर्म इन्शुरन्स क्षेत्रातही उडी घेतली आहे. आता त्यांनी पॉलिसी धारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. नव्या धोरणानुसार पॉलिसी धारक व्यक्ती देशातील कोणत्याही शहरात कोणत्याही शाखेत त्यांच्या पॉलिसीचा मॅच्युरिटी क्लेम करू शकतो. या घोषणेमुळे पॉलिसीधारकांना अत्यावश्यक कागदपत्रांसह जवळच्या कोणत्याही शाखेत क्लेम करता येणार आहे. त्यामुळे ज्या कार्यालयात पॉलिसी घेतली तेथेच त्याचा क्लेम करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. 

सर्वांत मोठी विमा कंपनी 

एलआयसी ही देशातील सर्वांत मोठी आणि सरकारी विमा कंपनी आहे. एलआयसीच्या कार्यालयांचे देशभरात मोठे जाळे आहे. सध्या देशात एलआयसीची 113 विभागीय कार्यालयं असून, एकूण 2 हजार 048 शाखा आहेत. 1 हजार 526 फिरती कार्यालयं असून, 74 ग्राहक झोन आहेत. या कार्यालयांच्या जाळ्याच्या माध्यमातून देशात कोणत्याही पॉलिसीधारकाला त्याच्या मॅच्युरिटीचे पैसे गरजेच्या वेळी देणे शक्य होणार आहे. त्यासाठी पॉलिसीधारकाला अत्यावश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दरम्यान, पॉलिसीधारक कोठूनही क्लेम करू शकत असला तरी, क्लेमची रक्कम सर्व्हिस ब्रँच अर्थात मूळ पॉलिसी असणाऱ्या शाखेमार्फतच देण्यात येणार आहे. एलआयसीने ही सेवा तातडीने आणि प्रयोगिक तत्वावर राबवण्याची घोषणा केली.  प्रयोगिक तत्वावर 31 मार्चपर्यंत पॉलिसीधारकांना देशभरात कोठेही क्लेम करता येणार आहे. 

डिजिटलायझेशमुळे शक्य

गेल्या काही वर्षांत विमा क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळं एलआयसीनंही त्यांची पारंपरिक कार्यपद्धती बाजूला ठेवून आधुनिकतेची कास धरली. गेल्या काही वर्षांत एलआयसीच्या कार्यालयांचं डिजिटलायझेशन करण्यात आलंय. त्यामुळं एखाद्या पॉलिसीधारकानं देशाच्या कोणत्याही शाखेत क्लेमसाठी कागदपत्रे सादर केली तर, ती एलआयसीच्या देशभरातील डिजीटल नेटवर्कच्या माध्यमातून ट्रान्सफर करणे शक्य होणार आहे. कोरोनाच्या या काळात ग्राहकांना तत्पर आणि चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचं एलआयसीनं स्पष्ट केलंय. सध्या एलआयसीच्या देशभरात 29 कोटीहून अधिक पॉलिसी आहेत.

loading image
go to top