"एलआयसी' बंद होण्याच्या समाजमाध्यमांवर अफवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) बंद होणार अशा प्रकाराचा संदेश व्हॉट्‌सऍपसह काही समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे; मात्र हा संदेश खोटा असून "एलआयसी'नेही हे वृत्त फेटाळले आहे

मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) बंद होणार अशा प्रकाराचा संदेश व्हॉट्‌सऍपसह काही समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे; मात्र हा संदेश खोटा असून "एलआयसी'नेही हे वृत्त फेटाळले आहे. या खोट्या संदेशातून एलआयसीची प्रतिमा मलीन करून विमाधारकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप एलआयसीने केला आहे.

एलआयसीची आर्थिक स्थिती भक्कम असून विमाधारकांना सेवा देण्यास कटिबद्ध असल्याची हमी एलआयसीच्या मुंबई विभागाने दिली आहे. 2018-19 मध्ये एलआयसीने विमाधारकांना विक्रमी 50 हजार कोटींहून अधिक रुपयांचे बोनस वाटप केले होते. 31 ऑगस्ट 2019 अखेर विमा बाजारपेठेत एलआयसीचा सर्वाधिक 72.84 टक्के (विमा पॉलिसी) हिस्सा आहे. पहिल्या वर्षातील प्रीमियमचा विचार करता एलआयसीचा 73.06 टक्के हिस्सा आहे.

मार्च ते ऑगस्ट या कालावधीत एलआयसीचा पहिल्या वर्षातील प्रीमियमचा हिस्सा 66.24 टक्‍क्‍यांवरून 73.06 टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे एलआयसीने म्हटले आहे. एलआयसी बंद होण्याबाबत समाजमाध्यमांवरील खोट्या संदेशाकडे विमाधारकांनी दुर्लक्ष करावे, असे आवाहन एलआयसीने केले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "LIC" closure Rumors on social media