‘एसआयपी’सोबत आयुर्विमा मोफत!

सुहास राजदेरकर
सोमवार, 4 जून 2018

म्युच्युअल फंड कंपन्या एकावर एक फ्री देऊ शकत नसल्या तरीसुद्धा स्पर्धेमुळे आता तुमच्या सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनवर (एसआयपी) तुम्हाला आयुर्विमा अर्थात लाइफ इन्शुरन्स फ्री नक्कीच मिळू शकतो. ‘आदित्य बिर्ला’ आणि ‘रिलायन्स’नंतर आता आयसीआयसीआय म्युच्युअल फंडानेसुद्धा ‘एसआयपी प्लस’ अशी लाईफ इन्शुरन्स फ्री देणारी संकल्पना नुकतीच बाजारात आणली आहे. काय आहे ही संकल्पना ते थोडक्‍यात पाहूया.

म्युच्युअल फंड कंपन्या एकावर एक फ्री देऊ शकत नसल्या तरीसुद्धा स्पर्धेमुळे आता तुमच्या सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनवर (एसआयपी) तुम्हाला आयुर्विमा अर्थात लाइफ इन्शुरन्स फ्री नक्कीच मिळू शकतो. ‘आदित्य बिर्ला’ आणि ‘रिलायन्स’नंतर आता आयसीआयसीआय म्युच्युअल फंडानेसुद्धा ‘एसआयपी प्लस’ अशी लाईफ इन्शुरन्स फ्री देणारी संकल्पना नुकतीच बाजारात आणली आहे. काय आहे ही संकल्पना ते थोडक्‍यात पाहूया.

या ‘एसआयपी’मध्ये एक वर्ष कालावधीच्या ‘एसआयपी’वर महिन्याच्या रकमेच्या दहा पट, दोन वर्षाच्या ‘एसआयपी’वर ५० पट आणि तीन वर्षाच्या ‘एसआयपी’वर १०० पट लाईफ कव्हर मोफत मिळणार आहे. उदाहरणार्थ, सोबतची चौकट पाहा.

कोणाला मिळेल फायदा?
योजनेतील हा फायदा सर्व भारतीय रहिवासी; तसेच अनिवासी भारतीय वैयक्तिक गुंतवणूकदारांना मिळेल; परंतु कंपन्या अथवा संस्थात्मक गुंतवणूकदारांना हा फायदा मिळणार नाही. यासाठी गुंतवणूकदाराचे वय १८ ते ५१ यामध्ये असणे आवश्‍यक आहे. ‘एसआयपी’चा कालावधी कमीतकमी तीन वर्षे असला पाहिजे. लाइफ इन्शुरन्स फक्त वयाच्या ५५ वर्षांपर्यंतच मिळेल. कमाल लाइफ कव्हर ५० लाख रुपये आहे. ठराविक कालावधीनंतर ‘एसआयपी’ बंद केली तरी इन्शुरन्स मिळण्यासाठी साठलेली रक्कम ५५ वर्षे वयापर्यंत ठेवणे बंधनकारक राहील. पहिल्या युनिटधारकालाच इन्शुरन्सचा फायदा मिळेल. योजनेमधील इन्शुरन्सचा हप्ता आयसीआयसीआय ॲसेट मॅनेजमेंट कंपनी भरेल. युनिटधारकांवर कोणताही बोजा पडणार नाही. ज्या योजनांमध्ये इक्विटी गुंतवणूक आहे, अशा सर्व योजनांसाठी हा लाभ मिळेल.

यासाठी कोणतीही वैद्यकीय चाचणी करावी लागणार नाही. फक्त तुमची तब्येत चांगली असल्याचे आणि कोणतेही आजार नसल्याचे सेल्फ सर्टिफिकेट द्यावे लागेल. लाइफ कव्हरसाठी, युनिटधारकांनी अर्जामध्ये आपली जन्मतारीख देणे बंधनकारक राहील. ‘एसआयपी’ सुरू केल्यापासून एका वर्षभरात आत्महत्या केली तर लाइफ कव्हर मिळणार नाही; तसेच ४५ दिवसांच्या आत, अपघाताव्यतिरिक्त इतर कारणांनी मृत्यू झाला तर कव्हर मिळणार नाही. नामांकन असलेल्या व्यक्तीला (नॉमिनी) आपला दावा इन्शुरन्स कंपनीकडे थेट करावा लागणार आहे. हे इन्शुरन्स आयसीआयसीआय लाइफ या कंपनीचेच दिले जाणार आहे.

नव्या ‘एसआयपी’वरच लाभ
जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी तुम्हाला एकाच योजनेत ‘एसआयपी’ करण्याची सक्ती नाही. तुम्ही गुंतवणूक आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या विविध इक्विटी योजनांमध्ये विभागून करू शकता. कारण, तुमची एकूण ‘एसआयपी प्लस’ रक्कम तुमच्या पॅन नंबरवरून एकत्र करण्यात येईल व त्यावर इन्शुरन्स देण्यात येईल. तुमच्या आधी सुरू असलेल्या ‘एसआयपी’वर हा फायदा मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला नवी ‘एसआयपी प्लस’ सुरू करावी लागेल, ज्यासाठी वेगळा फॉर्म आहे. तात्पर्य, आता नुसती ‘एसआयपी’ करण्यापेक्षा त्यामध्ये इन्शुरन्सचा फायदा देणारी ‘एसआयपी’ करणे योग्य वाटते.

Web Title: Life insurance free with SIP