‘आरकॉम’वरील कर्जाचा भार वाढतोय

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मे 2017

मुंबई: कर्जाचा वाढता भार आणि निराशाजनक तिमाही निकालांमुळे उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा(आरकॉम) शेअर कोलमडला आहे. आज(सोमवार) इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 20 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदविण्यात आली आहे.

मुंबई: कर्जाचा वाढता भार आणि निराशाजनक तिमाही निकालांमुळे उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा(आरकॉम) शेअर कोलमडला आहे. आज(सोमवार) इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 20 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदविण्यात आली आहे.

दूरसंचार क्षेत्रात कंपन्यांमध्ये सुरू झालेले 'डेटा युद्ध' आणि या क्षेत्रात नव्याने प्रवेश झालेल्या 'जिओ'मुळे रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा फटका बसला आहे. कंपनीला तब्बल 10 बँकांच्या कर्जाचे हप्ते फेडण्यात अपयश आले आहे. यामुळे अनेक बँकांनी कंपनीच्या मालमत्ता 'स्पेशल मेन्शन अकाउंट' श्रेणीत टाकल्या आहेत, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. अशा श्रेणीतील खात्यांचे व्याजदेखील थकित असते. मात्र, कंपनीने याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

रिलायन्स कम्युनिकेशन्सला मार्च 2017 अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत रु.948 कोटींचा तोटा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने रु.79 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. कंपनीला जानेवारी-मार्च या तिमाहीत रु.4,524 कोटींचा महसूल मिळाला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 24 टक्के कमी आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीला रु.1,283 कोटींचा तोटा झाला आहे. त्याआधीच्या वर्षात कंपनीने (2015-16) रु.660 कोटींचा नफा नोंदवला होता.

मुंबई शेअर बाजारात रिलायन्स कम्युनिकेशन्सचा शेअर सध्या(1 वाजून 25 मिनिटे) 20.90 रुपयांवर व्यवहार करत असून 4.90 रुपये अर्थात 18.99 टक्क्यांनी कोसळला आहे. पाच रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या शेअरने वर्षभरात 19.70 रुपयांची नीचांकी तर 55.40 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या भावानुसार कंपनीचे 5,189.52 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

 

Web Title: Loan load on 'RCom' is increasing