Look back 2020: Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे धडे

investment
investment

भारतीय शेअर बाजार २०२० या वर्षात स्थिर स्थिती, दोलायमान स्थिती, मंदी आणि तेजी या सर्व स्थितीतून गेला. खरेतर वर्षाची सुरवात चांगली झाली होती आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकदार नियमितपणे गुंतवणूक करत होते, मात्र मार्च २०२० मध्ये अचानक ‘लॉकडाउन’ सुरू झाले आणि त्याचे पडसाद शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीत उमटले. बाजाराच्या या चढ-उतारांनी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना पुढील महत्त्वाचे चार धडे दिले. 

१. दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवा! 

दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवल्यास इक्विटी फंडातील गुंतवणूक चांगला परतावा देते, हे २०२० वर्षात पुन्हा एकदा सिद्ध झाले. अल्पकाळात अशा फंडांचा परतावा गटांगळी खात असला तरी त्याकडे दुर्लक्ष करून दीर्घकाळातील गुंतवणुकीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे. उदा. एचडीएफसी इक्विटी फंडात वीस वर्षांपूर्वी गुंतविलेल्या दहा लाख रुपयांचे सध्याचे बाजारमूल्य सुमारे साडेतीन कोटी रुपये आहे. १९९५ वर्षी सुरू झालेल्या या फंडाने गेल्या २५ वर्षांत सरासरी १७ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. इक्विटी फंडातील मिडकॅप फंड हा थोडासा जोखीमयुक्त समजला जातो, परंतु निप्पॉन ग्रोथ या मिडकॅप फंडात वीस वर्षांपूर्वी गुंतविलेल्या दहा लाख रुपयांचे सध्याचे बाजारमूल्य सुमारे साडेपाच कोटी रुपये एवढे प्रचंड आहे. १९९५ या वर्षी सुरू झालेल्या या फंडाने गेल्या २५ वर्षांत सरासरी २१ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. ‘लॉकडाउन’च्या सुरवातीच्या काही दिवसात या फंडांच्या एनएव्ही (बाजारभाव) खाली गेल्या होता, मात्र त्यामुळे विचलित न झालेल्या गुंतवणूकदारांना त्याचा फायदा झाला. 

२. अल्पकाळातील मंदी ही संधी माना! 

मार्च ते मे २०२० या कालावधीत ‘लॉकडाउन’चा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला होता. सर्वत्र मंदीसदृश वातावरण होते. भारतीय शेअर बाजाराचे ‘निफ्टी’ आणि ‘सेन्सेक्स’ हे निर्देशांकदेखील गडगडले होते. अशावेळी या निर्देशांकांत समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करीत असलेल्या इंडेक्स फंडात गुंतवणूक करण्याची मोठी संधी होती. त्यावेळी अशा फंडात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना अगदी थोड्या कालावधीत उत्तम परतावा मिळाला. उदा. एचडीएफसी इंडेक्स फंड (निफ्टी प्लॅन) या फंडात एप्रिल २०२० मध्ये दहा लाख रुपये गुंतविलेल्या गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचे डिसेंबर २०२० मध्ये बाजारमूल्य तब्बल ६० टक्क्यांनी वाढून १६ लाख रुपयांच्या आसपास पोचले आहे. 

३. गुंतवणुकीचा समतोल सांभाळा! 

आपल्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी फंडांसोबत बॅलन्स्ड फंड, डेट फंड आणि गोल्ड फंडाचा समावेश केल्यास गुंतवणुकीतील एकूण समतोल सांभाळला जातो. गुंतवणुकीतील जोखीम कमी करणारे फंड आपल्या पोर्टफोलिओच्या भात्यात अवश्य असावेत, हे २०२० वर्षाने पुन्हा एकदा सिद्ध केले. शेअर बाजार कोसळत होता, तेव्हा असे फंड समाधानकारक परतावा देत गुंतवणूकदारांना आधार देत होते. विशेषतः बँकेच्या मुदत ठेवींवरील व्याजदर घसरत होते, तेव्हा या फंडांनी त्या तुलनेत समाधानकारक परतावा दिला. गोल्ड फंडांनी तर या वर्षात अक्षरशः झळाळती कामगिरी केली. ज्या गुंतवणूकदारांच्या भात्यात हे फंड होते, त्यांच्या पोर्टफोलिओला शेअर बाजारातील हेलकाव्यांचे धक्के कमी बसले. 

आणखी बातम्या व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

४. भावनाविवश होऊन निर्णय घेणे टाळा! 

भावनेच्या भरात घेतलेले आततायी निर्णय आपले नुकसान करतात, हे म्युच्युअल फंडातील काही गुंतवणूकदारांनी या वर्षात अनुभवले. अशा गुंतवणूकदारांनी कोसळलेल्या बाजाराने घाबरून जाऊन आपली गुंतवणूक मार्च-एप्रिल २०२० च्या दरम्यान विकून टाकली. असे गुंतवणूकदार बाजारात नंतर आलेल्या तेजीला मुकले. दुसऱ्या बाजूला, या वर्षभरात अनेक नवे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीस जोडले गेले. ‘ॲम्फी’ या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२० मध्ये भारतीय म्युच्युअल फंड व्यवसायाच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेने (एयूएम) ३० लाख कोटी रुपयांचा महत्त्वाचा टप्पा गाठला. विशेष म्हणजे वर्ष २०१० मध्ये ही मालमत्ता सात लाख कोटी रुपये होती. गेल्या दहा वर्षांत त्यामध्ये तब्बल साडेचारपट वाढ झाली आहे. 

हे चार धडे मनापासून लक्षात ठेवून गुंतवणूक करणाऱ्यांना येणाऱ्या नव्या वर्षातही म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून फायदा होईल, यात शंका नाही. 

(लेखक म्युच्युअल फंड विषयातील जाणकार व ‘पीएचडी’धारक आहेत.) 

Look back 2020

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com